Skip to main content
Uncategorized

Our Rotary Family

By August 28, 2023September 5th, 2023No Comments

कर्तव्यदक्ष भारती

“मातृ देवो भव, पितृ देवो भव, गुरु  देवो भव”

आपल्या संस्कृतीत जन्मदाते माता पिता यांच्या बरोबरीने गुरूंनाही वंदनीय मानले गेले आहे. पुढची पिढी घडवण्याचं काम ह्या तिघांकडूनही होत असतं, होणं अपेक्षित असतं. काळानुरूप परिस्थिती बदलते; शिक्षणाच्या कक्षा बदलतात; अपेक्षा बदलतात; माणसांच्या भूमिकाही बदललेल्या दिसतात. पण माता, पिता, गुरु, तिघांकडूनही चालत आलेल्या अपेक्षा अजूनही बऱ्याच प्रमाणात केल्या जातात. 

खरं तर आज परिस्थिती खूपच बदललेली दिसते. या बदलांना अनेक घटक कारणीभूत आहेत. तरीही काही गुरु मात्र आपली पूर्वापार चालत आलेली भूमिका इमाने इतबारे पार पाडत असतात, तो त्यांचा स्वभावच असतो. त्यातून त्यांच्या विद्यार्थ्यांना खऱ्या मार्गदर्शनाचा लाभ होत असतो तसंच त्या गुरुलाही कर्तव्यपूर्तीचं अपार समाधान लाभत असतं. अशीच एक गुरु आपली रोजची मैत्रीण आहे, ती म्हणजे भारती डोळे. 

भारतीने तिचं संपूर्ण करिअर अध्ययन आणि अध्यापन ह्यामध्ये व्यतीत केलं आहे, आणि तेही विद्यार्थ्यांना तिच्या विषयाचं जास्तीत जास्त ज्ञान, शक्य तेव्हढ्या सोप्या, सुलभ पद्धतीने देण्याचा कटाक्ष ठेवून! त्यामुळे वर्षानुवर्षे ठराविक विषय शिकवायचे असले तरी त्यातील अद्ययावत ज्ञान आणि पद्धती विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी भारतीने स्वतःचं अध्ययनही नेहमीच चालू ठेवलं.

भारती मूळची पुण्याचीच, शनिवार पेठेत राहणारी; अहिल्यादेवी शाळेत शिकलेली, पण जात्याच बुद्धिमान असलेल्या भारतीने शाळेतच इंग्रजी भाषा लिहिणं आणि बोलणं, दोहोंवर उत्तम पकड मिळवली. इतकी कि इंग्रजी भाषेतून होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांमध्येही तिने नेहमीच बक्षिसे पटकावली. जी गोष्ट इंगजीची, तीच बॅडमिंटनचीही. या खेळातही तिने इतके प्राविण्य मिळवले की देश पातळीवरील स्पर्धांसाठीही तिची निवड झाली. आई, वडील, आणि एक भाऊ अशा चौकोनी सुखवस्तू  कुटुंबात भारती लहानाची मोठी झाली. वडील बँकेत अधिकारी, आई कोर्टात नोकरी करणारी आणि शिस्तीला प्राधान्य देणारी. भारतीला लहानपणापासूनच वाचनाची अतिशय आवड होती त्यामुळे ती सतत वाचत बसत असे. गाण्याचीही तिला खूप आवड. गांधर्व महाविद्यालयाच्या तीन परिक्षा तिने शालेय वयातच पूर्ण केल्या होत्या. 

 खेळ, वाचन आणि गाणं अशा आपल्या आवडींसाठी पुरेसा वेळ मिळावा ह्या हेतूने  तिने कॉमर्स शाखेची निवड केली. बी. कॉम. आणि एम. कॉम पूर्ण होताच मॉडर्न कॉलेजने तिला नोकरी देऊ केली आणि भारती प्राध्यापक झाली. प्राध्यापकाची नोकरी मिळाली म्हणून भारतीने स्वतःचं शिक्षण थांबवलं नाही. तिने लगेच पी एच डी ही पूर्ण केलं. करिअरच्या सुरवातीलाच पी एच डी  पूर्ण केल्यामुळे तिला नोकरीत त्याचा आर्थिक फायदा नेहमीच मिळाला हे भारती आवर्जून सांगते. पी एच डी करताना एक डॉक्टरेट आपल्याला हवी म्हणून तिने कधीच अभ्यास केला नाही तर पाठयपुस्तकांखेरीज आणखीही काही शोधावं, आत्मसात करावं हा तिचा संशोधनामागचा हेतू होता. विद्यार्थ्यांनाही शिकवताना तिने हाच दृष्टिकोन सदैव बाळगला आणि त्यासाठी स्वतःही नेहमीच अभ्यास चालू ठेवला. ती म्हणाली, “माझा स्वभाव विद्यार्थ्यांमध्ये गुंतण्याचा नव्हता. ‘तास संपला, संबंध संपला’, अशा प्रकारचं माझं नेचर होतं. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना प्रथमच सांगून टाकत असे कि, मी तुमच्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. मी दिलेला अभ्यास तुम्ही केला कि नाही ह्याची शहानिशा करणार नाही. मी माझ्याकडून तुम्हाला शक्य तेव्हढं शिकवणार. तुम्हाला घ्यायचं तेव्हढं घ्या. या बाबतीत तुम्ही मला फसवू शकाल पण त्यात खरी तुमचीच फसगत असणार आहे.  प्रत्येकाला तुम्ही अभ्यासात कुठे आहात हे माहिती असणारच आहे “.  

तिच्या ह्या रोखठोक स्वभावाचा विद्यार्थ्यांवर नेहमीच चांगला परिणाम झाल्याचं तिने स्पष्ट केलं. ती म्हणाली, “विद्यार्थ्यांना कोणत्या प्राध्यापकाची किती तयारी आहे हे बरोबर ओळखता येतं, आणि त्याबाबतीत माझा नेहमीच कटाक्ष होता कि, लेक्चरला जाताना पूर्ण तयारीनिशी, अभ्यास करूनच जायचं. हा माझा स्वभावच होता. त्यामुळे मला विद्यार्थ्यांनी कधीच त्रास दिला नाही. उलट त्यांचं प्रेम मला सदैव मिळत राहिलं. 

भारतीने मॉडर्न महाविद्यालयात २५ वर्षे काम केलं. वयाच्या ४८ व्या वर्षी तिची आर्थिक प्राप्ती सर्वोत्तम झाली होती, तसाच नोकरीतही एकप्रकारचा तोचतोचपणा येऊ लागला होता. तेंव्हा तिने ताबडतोब ‘लॉ’ च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि एल एल बी पूर्ण करून टाकलं. त्या दरम्यान ‘इंटलेक्ट्युअल प्रॉपर्टी’ ह्या विषयाचं गरुड जगभर फैलावत होतं. तेव्हा ह्या विषयाच्या जागतिक संस्थेनं एक वर्षाचा जो अभ्यासक्रम ‘ऑनलाईन’ सुरु केला होता, तो भारतीने पूर्ण करून टाकला एवढंच नव्हे तर त्यात ९७.५ टक्के मार्क मिळवले आणि जगातल्या फार थोड्या व्यक्तींमध्ये तिची गणना झाली. भारतीने ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’ मध्ये पी एच डी मिळवली आहे. ह्या विषयाला व्यापार क्षेत्रात खूपच महत्व आहे. त्यामध्ये जशी अत्याधुनिक ज्ञान आणि प्रचलित प्रवाह ह्याविषयी भरती सदैव स्वतःला अपडेट करत रहायची, तीच गोष्ट ‘इंटलेक्ट्युअल प्रॉपर्टी राईट्स’ बद्दलही. त्यामुळे तिच्या याबाबतच्या लेखनाला खूप प्रतिसाद मिळाला आणि पर्यायाने उत्तम प्रसिद्धीही. तिचे सुमारे ७० लेख मराठा चेंबरच्या ‘संपदा’ ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. मार्केटिंग तसेच मॅनेजमेंट संबंधीची तिची ८ पुस्तकेही विद्यार्थीप्रिय झाली. तिच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पी एच डी पदवी प्राप्त केली आहे. मॉडर्न कॉलेज नंतर भारतीने कमिन्स च्या मॅनेजमेंट कॉलेज मध्ये १० वर्षे काम केलं आणि त्यातली ६ वर्षे डायरेक्टर म्हणून ती जबाबदारी सांभाळत होती. अनेक प्राध्यापकांना प्रशासकीय कामे करायला आवडत नाही. पण भारतीला प्रशासनातही रस आहे. कमिन्सच्या मॅनेजमेंट कॉलेजची डायरेक्टर म्हणून काम करण्यातही तिने खूप आनंद घेतला. ती म्हणाली, “प्रशासकीय कामात तुम्हाला सिस्टीम सेट करणं शक्य असतं आणि त्यात मला रस आहे.”

आपल्या फिटनेस बद्दल अतिशय काटेकोरपणे सर्व गोष्टी करणारी भारती, तिचं ३५ वर्षांचं करिअर इतक्या चोखपणे सांभाळतानाच तिने आपल्या कन्या, पत्नी, माता ह्या भूमिकाही तेवढ्याच चोखपणे बजावल्या. एम कॉम झाल्यानंतर १ वर्षाने तिचा विवाह झाला आणि मुलगा १ वर्षाचा असताना तिने पी एच डी चा प्रबंध सादर केला. ह्या सगळ्या तारेवरच्या कसरतीत तिच्या आईने तिला मदत केली, तसेच शरदनेही टेल्कोतील नोकरी सांभाळून शक्य ती मदत केली. भारतीच्या म्हणण्याप्रमाणे तिचा मुलगा आणि मुलगीही ‘स्वतंत्र’, स्वावलंबी वृत्तीचे आहेत. तिचा मुलगा अमेरिकेत फायनान्स क्षेत्रात कार्यरत असून सून कार्डिओलॉजिस्ट आहे, तर मुलगी व जावई आय टी क्षेत्रात अमेरिकेतच कार्यरत आहेत. 

भारतीच्या ह्या करिअर आणि संसाराच्या गडबडीत तिचा गाण्याचा, प्रवासाचा छंद अर्थातच जरा बाजूला राहिला. आता मात्र तिला ते दोन्ही करायची इच्छा आहे. शिवाय ‘रोटरी’च्या माध्यमातून ‘सोशल वर्क’ हि करायचं आहेच. ‘ज्या संस्थेत आपण जातो, तिथे काम केलंच पाहिजे’ ह्या भूमिकेतून तिने आपल्या क्लबची अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याचं मान्य केल्याचं तिने स्पष्ट केलं. ती म्हणाली, “रोटरीत येऊन मला मित्र, मैत्रिणी मिळाले, तसेच सोशल वर्क करायची संधीही. त्यामुळे आता हे सगळं करायची इच्छा आहे. बाकी कविता लेखन वगैरे चालूच असतं. भारतीला यापुढेही तिच्या सर्व कार्यात यश मिळत राहो हीच सदिच्छा. 

मुलाखतकार ॲन सरिता भावे

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016