Skip to main content

४ जुलै

।। कालाय तस्मै नमः ।।

पी पी मानस वाघ

रोटरीच्या नवीन वर्षाची पहिली मीटिंग या कार्यक्रमाने सुरू झाली. श्री . वामन कोल्हटकर हे या मिटींगला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. वेदाचार्य कै. विनायक भट्ट घैसास गुरुजी यांच्याकडे दशग्रंथ अध्ययन केल्यानंतर कोल्हटकर साहेबांनी सरस्वती मंदिर पुणे येथे शालेय शिक्षण घेतले आणि एस. पी. कॉलेजमध्ये गणित या विषयाचे शिक्षण घेतले. अमेरिकेमध्ये पर्ड्यू महाविद्यालयात त्यांनी गणिताचे पुढचे शिक्षण घेतले. आयुर्वेदिक औषधे हा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेला व्यवसाय होता. त्यात त्यांनी प्रवेश केला आणि “कैलास जीवन” या सुप्रसिद्ध औषधाची निर्मिती केली. त्या कंपनीमध्ये त्यांनी व्यवस्थापक ,भागीदार आणि नंतर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले.

त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण देण्याचे ठरवले आणि अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि संशोधन संस्थेमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले. त्यांनी पर्ड्यू महाविद्यालयात सुद्धा हे विषय शिकवले. विख्यात गणिती श्रीराम अभ्यंकर यांच्या सहाय्याने त्यांनी “भास्कराचार्य प्रतिष्ठान” या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या हाताखालून शेकडो विद्यार्थी अत्तापर्यंत गेले आहेत. त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी जगातल्या उत्तम महाविद्यालयात काम केले आहे.

त्यांना कीर्तन करण्याचा छंद आहे. त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांनी आपल्याला काळाचे महत्व समजावून सांगितले. काळाबद्दल अनेक कल्पना त्यांनी सांगितल्या. काळ गणना कधी सुरू झाली ते सांगता येत नाही. काळ हा नेहमी “आधीचा” आणि “नंतरचा” असतो, तो कधीही वर्तमान नसतो. कारण प्रत्येक क्षणाला तो बदलत असतो. सृष्टीची निर्मिती कशी झाली असावी याबद्दल नक्की माहिती कोणालाच नाही. ती कधी झाली हे सुद्धा नक्की सांगता येत नाही. प्रकाशाचा वेग किती असतो ते त्यांनी सांगितले आणि दूर दिसणारा ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो हे त्यांनी सांगितले. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांची “थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी” हे काय आहे आणि ती अजून सुद्धा पूर्णपणे समजू शकली नाही असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अनेक उदाहरणे देत त्यांचे म्हणणे सुसूत्रपणे मांडले. या कार्यक्रमाला आपल्या क्लब ची उपस्थिती खूप होती. फेलोशिप देखील छान होती. प्रमुख पाहुण्यांची ओळख Ann मोहिनी बर्वेंनी केली आणि त्यांचे आभार पीपी मानस वाघ यांनी मानले.

९ जुलै

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर अध्यक्ष पदग्रहण समारंभ

रो. चंद्रशेखर यार्दी

दर वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या क्लबचा पदग्रहण समारंभ सर्वांच्या सहकार्याने व मेहनतीने ९ जुलै रोजी हॉटेल प्रेसिडेंट येथे अतिशय छान संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डी जी अनिल परमार आणि त्यांच्याबरोबर डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी हेमा हे दोघेही होते. ए जी तनुजा मराठे व ए जी ए अंकुश पारख हे सुद्धा उपस्थित होते.

त्याचप्रमाणे पी डी जी मुकुंदराव व अंजलीताई, पी डी जी मोहन पालेशा व पी डी जी दीपक व गौरी शिकारपूर यावेळी उपस्थित होते. प्रांताचे अनेक अधिकारीही या वेळी उपस्थित होते. तसेच अध्यक्ष मृणाल हिचे नातेवाईक व मित्रपरिवार तिचे अभिष्टचिंतन करण्यास हजर होता.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि रोटरी गीत याने झाली. सुरुवातीला आय पी पी शोभाताई यांनी उपस्थितांचे स्वागत करून थोडक्यात गेल्या वर्षीच्या कामाचा आढावा घेतला. नंतर आय पी पी शोभाताई व अध्यक्ष मृणाल नेर्लेकर यांनी चार्टर व कॉलरचे आदानप्रदान करून शोभाताईंनी रीतसर अध्यक्षपदाची सर्व सूत्रे मृणालकडे सुपूर्द केली. शास्त्राप्रमाणे पूर्व सेक्रेटरी अजय यानेसुद्धा विद्यमान सेक्रेटरी प्रमोदकडे सचिवपदाची सर्व सूत्रे सोपविली. नंतर अध्यक्ष अनिल यांच्या हस्ते सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांना पिन्स देण्यात आल्या. यांनतर अध्यक्ष मृणाल हिचे भाषण झाले. या भाषणात तिने पुढील वर्षात केलेल्या योजनांचे थोडक्यात विवरण केले. पदग्रहण समारंभापर्यंत आपल्या क्लबच्या सदस्यांनी सुमारे ७००० डॉलरची भरघोस वर्गणी जमवून रोटरी फौंडेशनला जाहीर केली. त्यांचे विशेष कौतुक मृणाल आणि डी जी अनिल यांनी केले.

ए जी तनुजा मराठे यांनी डी जी अनिल परमार यांची ओळख करून दिली. डी जी अनिल यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर चे कौतुक केले आणि आपल्या क्लबकडून या वर्षीसाठी त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत असे सांगितले. डिस्ट्रिक्टने हाती घेतलेल्या वर्ष २२-२३ साठीच्या योजनांचीसुद्धा त्यांनी रूपरेषा सांगतली. डिस्ट्रिक्ट कॉन्फेरेंस यावेळी अँबी व्हॅली येथे होणार आहे. त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

शेवटी सेक्रेटरी रो. प्रमोदने येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन गिरिजाने केले. आभार भावी अध्यक्ष रो. स्मिताताईंनी मानले. सर्व कार्यक्रम अगदी आखीव-रेखीव, नेटका-नेमका झाला. प्रत्येकाने आपापली अंगीकृत कामे चोख पार पाडली. सर्व अगदी ठरल्याप्रमाणे पार पडले. एकामागून एक कार्यक्रम जलद गतीने झाल्यामुळे जवळपास दोन तास चाललेला कार्यक्रम कोठेही कंटाळवाणा झाला नाही. कार्यक्रमानंतर अनेकांनी भेटून आवर्जून कार्यक्रम आयोजनाची स्तुती केली. याचे श्रेय इव्हेंट टीमचा प्रमुख अजय गोडबोले, संपूर्ण इव्हेंट टीमला, जुलै सपोर्ट ग्रुपला व त्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणाऱ्या आपल्या अनेक मित्रांना जाते. या कार्यक्रमाच्या यशाबद्दल प्रत्येकाचे नाव घेऊन कौतुक करायचे म्हणजे रोस्टरचेच जाहीर वाचन करावे लागेल. त्यामुळे सर्वांचे एकत्रित आभार व अभिनंदन.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016