Skip to main content
Program Reports

Programs done in August

By September 1, 2022September 5th, 2022No Comments

८ ऑगस्ट

Breaking the News

रो. आनंद नवाथे

आठ ऑगस्ट च्या सोमवारी आपल्याकडे इंडियन एक्सप्रेसचे विशेष वार्ताहर श्री. सुशांत कुलकर्णी आले होते. गुन्हेगारी,संरक्षण व कायदा आणि सुव्यवस्था ह्या क्षेत्रातील वार्तांकनाचे काम प्रामुख्याने ते करत असतात. मुळात अभियांत्रिकीचे पदवीधर असलेल्या त्यांनी मास कम्युनिकेशन व जर्नालिझम अभ्यास केला आहे.त्यांनी नक्षलवादी चळवळीचा जोर असलेल्या धोकादायक भागात जाऊन प्रत्यक्ष काम केलेले आहे.सुरवातीला रो. डॉ . भारती डोळेने त्यांची यथायोग्य ओळख करून दिली.  

बातमी मिळवण्यासाठी अशा लोकांना सतत पोलिसांच्या संपर्कात रहावे लागते.जो कोणी बातमी देईल तो बातमीचा स्रोत.  सध्याच्या काळात आपण वारंवार ब्रेकिंग न्यूज हे शब्द टीव्हीवर पहात असतो. त्याची सुरवात प्रथम अमेरिकेत झाली. एखादी अतिशय महत्वाची बातमी चालू असलेला कार्यक्रम थांबवून म्हणजे ब्रेक करून दिली जायची आणि म्हणून त्याला हे नाव पडले परंतु आता सरसकट प्रत्येक वेळी हा शब्द वापरून त्याचे महत्व  आणि गांभीर्य कमी झाले आहे.सुरखियाहा एक असाच शब्द. ह्याचा अर्थ लाल रंग,काळ्या कागदावर लाल अक्षरात लिहिलेल्या अशा बातम्यांना म्हणून हे नाव पडले.    

बातमी ज्यावेळी आपल्यासमोर येते त्यामागे फार मोठी यंत्रणा काम करत असते. पण ती कोणत्या स्वरूपात दाखवली किंवा दिली जाते हि महत्वाची गोष्ट आहे. वर्तमानपत्र काय किंवा न्यूज चॅनेल काय, त्यांचे स्वतःचे एक अर्थकारण त्यामागे असते कारण त्यांना ते व्यवसाय म्हणून चालवावयाचे असते.त्याच्या बरोबरीने समाजकारण,राजकारण ह्यांचाही विचार करावा लागतो.त्यामुळे सत्य विकृत होऊ शकते. त्यामुळे नमुना म्हणून त्यांनी बीबीसीची एक क्लिप दाखवली. युद्धामुळे शाळा उध्वस्त होऊनही एक अंध मुलगा शिक्षणासाठी कसा प्रयत्न करतोय हे दाखवताना कोठेही युद्धाचे भीषण चित्र दाखवले नव्हते. 

त्यामुळे आपण वाचक किंवा श्रोता म्हणून बातमी वाचताना/ऐकताना त्या बातमीमागचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे,माध्यम साक्षर व्हायला पाहिजे .त्या बातमीचा ज्या अनेक घटकांशी संबंध असतो त्याचा तोल  योग्य प्रकारे सांभाळला जातो आहे ना हे पहिले  पाहिजे असे आवाहन करून बातमी ही संवाद करणारी,भावना निर्माण करणारी व काम करण्यास उदयुक्त करणारी असावी असे सांगून भाषणाचा शेवट केला. 

रो. आनंद यांनी सुशांत कुलकर्णी यांचे आभार मानले व आज त्यांच्या भाषणामुळे चांगले प्रबोधन झाले व एक वेगळी   दृष्टी मिळाली असे नमूद करून कार्यक्रम संपला.

२२ ऑगस्ट

फोटोग्राफीचे फ़ंडे - annet ओजस गाडगीळ

रो. डॉ भारती डोळे

२२ तारखेच्या सोमवारी —- annet  ओजस गाडगीळ याने   फोटोग्राफीचे  फ़ंडे या विषयावर क्लबमध्ये  सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या  सुरवातीला रो. डॉ  भारती डोळे यांनी त्याची ओळख करून दिली. ओजस हा रो. अशोक गाडगीळ आणि ऍन अंजली गाडगीळ यांचा सुपुत्र.

एका कॉस्ट अकौन्टिंग कंपनीमध्ये  अकाउंट असिस्टंट आहे,पण डेबिट आणि  क्रेडिट यात गुरफटून राहता  त्याने फोटोग्राफीचा छंद जोपासून आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे. गेली दहा वर्षे तो या क्षेत्रात आहे. विविध पक्षांचे  फोटो दाखवून तो सभासदांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेलावेगवेगळ्या रंगांचे , आकाराचे, पक्षी पाहून सभासद हरखून गेले. अतिशय सोप्या भाषेत त्याने पक्षांसंबंधी खूप माहिती दिली. पक्षांचे खाद्य , नरमादीमधी फरक , विणीचा काळ अशी विविध वैशिष्ट्येसुद्धा त्याने सांगितली. काही पक्षांचे आवाजही त्याने ऐकविले. त्यामुळे खरंच  bird watching –ला  आलो आहे असे वाटू लागले.

देशीविदेशी  पक्षांचे सुंदर फोटो बघताना त्याने घेतलेल्या परिश्रमांची जाणीव होत होती. ओजसने कॅमेरा, फोटोग्राफीचे तंत्र , पक्षी व   प्राणी यांचे फोटो काढण्यामधील आव्हाने या संबधी सुद्धा माहिती दिली. फोटो कसे काढावे याचे मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे क्लबला संबोधित करणारी  गाडगीळांची ही तिसरी पिढी आहे. ओजसच्या आजोबांचे वडिलांचेसुद्धा क्लबमध्ये व्याख्यान झाले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी  रो. किरण वाळिंबे यांनी आभार प्रदर्शन केले. स्वतः wild life आणि पक्षी  ह्यांच्या फोटोग्राफीत विशेष  रुची असणाऱ्या पी पी किरण वाळिंबे ह्यांनी ओजस चे विशेष कौतुक करून काहीसे मार्गदर्शन देखील केले.

२९ ऑगस्ट

पं. शौनक अभिषेकी- मानद सदस्य

पी पी आनंद नवाथे

अनेक मान्यवर व्यक्ती व थोर कलाकार आत्तापर्यंत आपल्या क्लबचे सन्माननीय सभासद बनलेले आहेत. त्याच मालिकेत आणखी एका मोठ्या कलाकाराची भर पडली आहे ते आहेत पं. शौनक अभिषेकी.प्रसिद्ध गायक पं जितेंद्र अभिषेकी यांचे ते सुपुत्र. २९ ऑगस्ट ह्या दिवशी आपण त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

सुरुवातीला रो. डॉ. भारतीने त्यांचा थोडक्यात परिचय करून दिला व ह्या सदस्यत्वामागील भूमिका विशद केली. नंतर ज्येष्ठ रोटेरिअन  पी पी विनूभाऊ व पी पी आर. टी. कुलकर्णी यांच्या हस्ते पंडितजींना रोटरी पिन लावली गेली.  खुद्द प्रे. डॉ.  मृणालनेच पंडितजींची मुलाखत घेतली.अभिषेकी हे मूळचे नवाथे पण मंगेशीच्या अभिषेकाचे वतन मिळाल्यामुळे ते अभिषेकी बनले.दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे चुलत आजोबा. अगदी लहानपणापासूनच सतत संगीत कानावर पडलेले. त्यातच मोठ्या दिग्गज कलाकारांचा नेहमी घरी राबता. त्यामुळे शौनक संगीताकडे वळले. अर्थात त्यांना चांगली जाण आहे व शुद्ध  निकोप आवाज आहे अशी खात्री झाल्यावरच वडिलांनी त्यांना शिष्य म्हणून इतरांबरोबर शिकवण्यास सुरवात केली. ह्या क्षेत्रात गुरु-शिष्य परंपरेनेच विद्यार्जन करावे लागते. शौनकजींना शेवटपर्यंत वडिलांचा एक आदरयुक्त दरारा होता.१० ते १२ शिष्य घरी असायचे व शौनकजींच्या आई सर्वांचे पालन पोषण आईच्या मायेने करायच्या. त्यांनी स्वतःच्या करिअरचा  विचार न करता पतीच्यापाठीमागे आपली सर्व शक्ती उभी केली ज्यामुळे अनेक शिष्य घडले.  . शौनकजींनी ह्या गोष्टीचा कृतज्ञापूर्वक उल्लेख केला. 

त्यांनी संगीत क्षेत्रातच करिअर करायचे ठरवले तरी नेहमीचे शिक्षण घेण्याबाबत त्यांच्या जितेंद्र अभिषेकींनी  वडलांचा कटाक्ष होता कारण ते स्वतः संस्कृत घेऊन एम. ए . झाले होते.त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.त्यांनी १९७५ ते १९८० ह्या काळात लोणावळ्यामधे संगीत विद्यालय काढले होते.जितेंद्र अभिषेकींनी लोप पावत चाललेल्या संगीत नाटकांना संजीवनी दिली व त्याला कालानुरूप नवे स्वरूप दिले. 

एका प्रश्नाला उत्तर देताना, पहिली अशी मैफिल नसते तर अनेक मैफिलीत गाऊन आपण आपल्याला सिद्ध करायचे असते असे ते म्हणाले.शिकणाऱ्याला चिकित्सा पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि डोळसपणे नवनिर्मिती करता आली पाहिजे हे त्यांचे विचार स्वानुभवातूनच असल्याचे जाणवले. आपली ओळख काय विचारले असताना माझे गुरु हीच माझी ओळख असे मोठे विनयशील उत्तर त्यांनी दिले. 

पंडितजींना आध्यात्मिक बैठक आहे.ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करतो तो ब्राह्मण अशी सोपी व्याख्या ते सहज बोलून जातात. गाण्याबरोबरच खाण्याचीही तेवढीच आवड असल्याचे माझ्या शरीराकडे बघून तुमच्या लक्षात आले असेल असे दिलखुलासपणे बोलणाऱ्या पंडितजींची हि एक प्रकारे गप्पांची मैफिलच चालू होती. 

 साथसंगत असल्याशिवाय गाता येत नाही असं असूनही पंडितजींनी “कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ” ह्या गाण्याची एक झलक म्हणून दाखवली. 

 कलाकार हा जन्मालाच यावा लागतो व आज पंडितजींसारख्या व्यक्तीला आमच्या क्लबचे मानद सदस्यत्व देऊन आम्ही आमच्या क्लबचा सन्मान वाढवला आहे ह्या शब्दात रो. आनंदने त्यांचे आभार मानले. प्रे. मृणालनेही अतिशय ओघवती व सहजसुंदर मुलाखत घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. 

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016