Skip to main content
Parents

Parents’ Section

By October 28, 2022November 15th, 2022No Comments

रो. अश्विनी अंबिके

चि चि

चि चि ने आज ठरवलं होतं सायकल चालवायला आज तरी आलीच पाहिजे.गेले पंधरा दिवस तो रोज सोसायटीत सायकल शिकायला जायचा.. शिकायला म्हणजे काय, एकटाच प्रयत्न करायचा पण कधी कोणाशी भांडायचा,तर कधी जोरात आपटल्यामुळे रडत रडत घरी  जायचा..

मुळात चि चि थोडा चिडक्या स्वभावाचा.आई सारखं सांगत असे,अरे किती चिडतोस सारखा? चिडून काय होणार? उलट चिडचिड केल्याने नुकसान जास्त होते बर का?जरा डोकं शांत ठेवत जा..पण चि चि कुठला ऐकतो….!

तर हा चिचि गेले पंधरा दिवस सायकल शिकतोय..चिडक्या  स्वभावामुळे याचं कोणाशीच पटत नाही तर याला सायकल शिकवणार कोण?सायकलच्या डाव्या पायडल वर उजवा पाय ठेवून जमिनीवर घासत घासत प्रयत्न चालू असतात एकट्याचे..!

ट्रिंग…. ट्रिंग……. अरे जरा बाजूला सरकाssss… मी सायकल शिकतोय दिसत नाही का?मध्येच सोसायटीत गाड्या  धुवायला आलेला रमेश मध्ये आला आणि चिची चा तोल गेला. अरे मी येत होतो ना समोरून?दिसत नाही का मी शिकतोय? चि चि त्याच्यावर ओरडलाच आणि चरफडला मनातल्या मनात…!

तेवढ्यात आईने हाक मारली आणि चिचि ला घरी जावं लागलं पुन्हा चिडचिड करत चि चि  घरात शिरला..शी: आई काय ग हे? आज पण मला सायकल चालवता आली नाही.सारखं कोणीतरी मध्ये येत होतं आणि मी पाय टेकून थांबत होतो. कधी येणार मला सायकल चालवता?

साहिल, समीर,पार्थ कसले भारी चालवतात,रेस पण लावतात.. दोन्ही हात सोडून पण त्यांना चालवता येते.. मला अजून चालवताच येत नाही तर दोन हात कसे सोडणार आणि रेस तरी काय लावणार… आणि आज त्या गोखले काकू काय म्हणाल्या माहित आहे का? म्हणे अरे चिरागसोसायटीत कशाला चालवतोस नीट येत नाही अजून तर? समोरच्या ग्राउंड वर जाऊन चालव हवी तेवढी.. इतका राग आला त्या काकूंचा.. चेहरा डोळे लालबुंद होऊन चि चि बोलत होता आल्या आल्या..!

आई शांतपणे सगळं ऐकत होती. हे बघ चिराग, इतकी चिडचिड करतोस ना म्हणूनच सगळे तुला चि चि म्हणतात. चिडका चिराग..!

अशाने तुला सायकल चालवायला तर जमणार नाहीच पण सगळ्यांशी भांडण केलंस तर कुणी तुझ्याशी बोलणार पण नाही,उलट हसतील तुला..आई म्हणाली.

हसू दे.. एक तर मला टांग टाकून चढता उतरता येत नाही. माझे पायच पुरत नाहीत तर काय करू?परवा असंच टांग मारताना तोल गेला तर अनुया हसायला लागली. म्हणाली, किती दिवस शिकतोयस रे चि चि..अजून येत नाहीये सायकल???? असं म्हणत निघून गेली.जाडी कुठली..!

या मुलाचा चिडचिडेपणा कसा घालवावा असा हाताशपणे आई विचार करत असतानाच शेजारचा समीर घरी आला. सगळी मुले याला कुल सॅम असे म्हणत.. कुठल्याही खेळात तो कॅप्टन असतो कूल म्हणजे थंड,शांत स्वभावाचा,सगळ्यांशी जुळवून घेणारा,हसतमुख, थोडक्यात चीचीच्या अगदी विरुद्ध..

त्याला बघताच आई म्हणाली, “बरं झालं बाबा तू आलास. समजाव चिरागला. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून इतका चिडतो की बास.चिराग तू सांग तू का चिडला आहेस ते”. समीर हसत म्हणाला,काकू मला सगळं माहितीये. मी गॅलरीतून बघत असतो चि चि सायकल चालवतो तेव्हा.काल त्या गोखले काकूंशी किती वेळ वाद घालत होतास. त्यांचं काहीच चुकलं नव्हतं. समोर मोकळं मैदान असताना इथे गर्दीत कशाला सायकल चालवायची? तेही येत नसताना. मग धडकलास काकूंच्या अंगावर जाऊन.नशीब समोर भिंत होती..

चि चि म्हणाला, ” हे बघ,सारखं मला सायकल येत नाही येत नाही हे सांगू नकोस कळलं ना?? माहितीये मला अजून येत नाहीये.. पण ती येण्यासाठी काय करू सांग.. ” चि चि अधीरपणे म्हणाला समीर म्हणाला,एका वाक्यात सांगायचं, तर चिडचिडेपणा बंद कर म्हणजे सायकल लगेच चालवता येईल ..चि चि म्हणाला हँ काहीही काय?अरे सायकल येत नाही म्हणून तर चिडलोय ना.. जोरात हसत समीर म्हणाला अजिबात नाही.तुझा स्वभाव चिडचिडा आहे म्हणून तुझ्याशी कोणी बोलत नाही, आणि तुझ्या वाटेला कोणी जात नाही. गार्गीला मी सायकल शिकवली.माहितीये ना तुला? तुला पण शिकवली असती पण तू वाटत कोणी आलं गेलं तरी  चिडतोस.तुझ्यासाठी काय सोसायटीतल्या सगळ्यांनी चालणं येणं जाणं बंद करायचं की काय?

चि चि एकदम शांत बसला. शेवटी समीरच म्हणाला, तुला एक आयडिया सांगतो.राग आला की दहा आकडे मोज. आपोआप तुझा राग शांत होईल. चि चि म्हणाला काय सांगतोस खरंच?? समीर म्हणाला,हो..उद्यापासून मी तुला सायकल शिकवतो,पण तुला दहा आकडे मोजायला जमत असेल तरच..त्याचा तुला स्वतःला जास्त फायदा होईल. शांत झालास की तुझा मेंदू नीट काम करेल.कुणाला काहीही बोलण्या ओरडण्याआधी विचार करशील..माझ्याकडून सायकल शिकायची असेल तर हे तत्व पाळ..चालणार असेल तर शिकवीन मी..चि चि म्हणाला,चालेल. उद्यापासून ठरलं. मी दहा आकडे मोजेन कोणाचाही राग आला की. पण तू खरच शिकवशील मला सायकल? मला छान चालवता आली पाहिजे.दोन्ही हात सोडून पार्थसारखी..!

समीर हसत म्हणाला, ” ठीक आहे.पण उद्यापासून का? आतापासूनच दहा आकडे मोजायला सुरुवात कर. बघू जमतंय का तुला.  चीची ला पटलं, न रागवण्याचे इतर पण बरेच फायदे आहेत हे त्याला शांतपणे विचार केल्यामुळे कळून चुकलं शिवाय हळूहळू मुलं त्याला चि चि म्हणणंही सोडून देतील.त्याला मुळी आवडतच नव्हतं कुणी चि चि  म्हटलेलं .

काय मुलांनो,पटतंय ना?   कोणावरही रागवण्याआधी 10 आकडे मोजा..बघा बर काय जादू होते ती…!

रो. मंजिरी धामणकर

वृक्ष आपुला मित्र चांगला,मित्र चांगला

वृक्ष आपुला मित्र चांगला,मित्र चांगला
प्रयत्न करुनी आपण सगळे वाचवूया त्याला.
तोडली जर झाडे अवघी
जंगल ना उरणार,
वाघ सिंह अन् हत्ती हरणे
सांगा कुठे राहणार
पक्षी अपुली सुंदर घरटी
कशी कुठे करणार
ढोली मधली खारुताई
बेघर की होणार
पशु पक्षी हे मूक विनविती
घरकुल द्या आम्हाला
म्हणून म्हणतो आपण सगळे वाचवू वृक्षाला.

जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा

जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
थोडा वेळ तुमच्याशी मारायच्यात गप्पा, जयदेव जयदेव
सर्वांना नेहमी करतो मदत,
स्वच्छतेची आम्ही घेतो शपथ
खेळ अभ्यास करतो दोन्हीही
करतो नाच आणि गातो गाणीही
जयदेव जयदेव
भांडलो तरी विसरतो लगेच
रुसलो तरीही हसतो लगेच
खातो पितो मस्त व्यायाम करतो
सगळे नियम आम्ही पाळतो
असेच नेहमी छान वागायला
बाप्पा बुद्धी द्या चांगली आम्हाला
जयदेव जयदेव.

By- Rtn Dr. Bharati Dole for Grand daughter Maya

ऍन प्रतिमा दुरूगकर

कबीर आणि ढोलू

कबीर आता ९ वर्षाचा झाला होता. तो खूप उंच झाला होता. त्याच्या आजीच्या खांद्याएवढा. (त्याला नेहमी आजीजवळ उभे राहून उंची मोजायला आवडे.)
नदीपलीकडील जंगलातील गोट्या हे माकडाचे पिल्लू कबीरचे घट्ट मित्र झाले होते. घराजवळील चुन्नु-मुन्नु कासवे व गोडुली ही स्नेल तर मित्र होतेच. कबीर नेहमी होडीतून नदीपलीकडे जंगलात जाई, गोट्याबरोबर भटके. त्याला आता जंगलाची, तेथील झाडांची, प्राण्याची ओळख होऊ लागली. जंगलाचे नियम वेगळे असत. गोट्या ते सांगे. कबीरला जंगल खूप आवडत असे.
त्या दिवशी गंमतच झाली. गोट्या आणि कबीर गप्पा मारत मारत जंगलात खूप आत गेले आणि त्यांना हत्तीचा कळप दिसला. दरीतील तळ्यावर ते पाणी प्यायला आले होते. कबीरला थोडी भिती वाटली. पण गोट्या म्हणाला, ‘मी या सर्वांना ओळखतो, तू घाबरु नको. मी तुझी पण ओळख करून देतो.’ त्या दिवशी कबीरला त्या कळपात एक छोटा दोस्त भेटला. ते हत्तीचे छोटे पिल्लू होते. पण तरीही केवढे मोठे! ते सारखे आईच्या खाली जाई. आई सोंडेने त्याला कुरवाळे. कळपात खूप हत्ती, हत्तीण, पिले होती.
कबीर व गोट्या जंगलात गेले की तळ्यावर जात. हत्तीचे पिलू पण तिथे खेळत असे. ते तिघे हळूहळू मित्र झाले. ते तळ्यात खेळत. पिलू सोंडेने कबीरवर पाणी फवारे. खूप मज्जा येई. गोट्या टुणकन उडी मारुन पिलावर जाऊन बसे. कबीरला मात्र ते जमत नसे. मग पिलू खाली बसे व कबीर त्याच्या पाठीवर जाऊन बसे. मग सर्वजण जंगलात फिरत. मज्जा येई.

हत्तीच्या पिलाच्या पाठीवरून फिरताना कबीरला खूप आनंद होई. ते गप्पा मारत, पण हळू आवाजात. ‘मोठा आवाज केला तर जंगलाची शांतता मोडते. ते जंगलाला आवडत नाही.’ गोट्याने सांगितले होते ना! कबीरला आता जंगलाचे नियम कळू लागले होते. फिरताना कबीर म्हणाला, ‘‘गोट्या तुझे नाव आपण ठेवले. या पिलूचे पण ठेवू. गोट्याने जोराने मान हलवून हो म्हटले. पिलाने सोंड हलवून ‘हो’ म्हटले. काय बर नांव ठेवावे? कबीर विचार करु लागला. पिलू वयाने लहान असले तरी आकाराने मोठेच होते. कबीरला आठवले, आजी म्हणायची, ‘‘कब्बू, तू जास्त खाल्लेस आणि व्यायाम केला नाहीस आणि बसून नसुता टी.व्ही. बघितलास, खेळला नाहीस तर ‘गजाढोल’ होशील. (म्हणजे हत्तीसारखा ढोल्या). ‘ढोलू’ नाव कसे आहे? कबीर म्हणाला. पिलाने सोंड वर करुन पसंती दाखविली. गोट्याने उड्या मारुन ‘हो’ म्हटले.

चालता चालता ढोलू झाडाच्या खोडावर सोंड घासे. त्यामुळे खोडाला ‘खाच’ पडे. कबीरने पाहीले की बर्‍याच झाडांना अशा मोठ्या खाचा पण होत्या. त्यात सरडे, किडे रहात होते. तळ्याच्या काठावर हत्ती चालताना खड्डे पडत. तेथे पाणी साचे. त्यात फुलपाखरे पाणी पीत असत. हत्तीचे ‘शेण’ सुद्धा खूप उपयोगी होते. त्यावर अनेक किडे जगत. ‘निसर्गाचे सायकल’ कबीरला समजू लागले होते. ढोलू खूप गवत खात असे आणि खूप पाणी पित असे. ढोलूच होता ना तो! पण तो शाकाहारी होता. तो प्राण्यांना मारत नसे. तरीही तो खूप शक्तीवान होता. कबीरला ते खूप आवडे. ‘हत्तीचा मेंदू सर्वात मोठा असतो’ आईने कबीरला सांगितले होते.

दिवस असे आनंदात जात होते. पण तो दिवस वेगळा होता. त्या दिवशी गोट्या व कबीर तळ्यावर गेले. पण त्यांना हत्तीचा कळप दिसलाच नाही. असे कसे झाले? दोघांना काळजी वाटली. ‘चल, आपण ढोलूला शोधू’ कबीर म्हणाला. मग ते दोघे जंगलात ढोलूला शोधायला निघाले. त्यांना आज जंगल उदास वाटले. त्यांचा मित्र नव्हता ना त्यांच्याबरोबर. वाटेत त्यांना हरीण भेटले. वानर भेटले. गोट्या सर्वांना ढोलूबद्दल विचारत होता. आणि मग एका झाडाखाली त्यांना ढोेलू दिसला. गोट्या आणि कबीरला बघून तो त्यांच्याकडे आला. ‘तो एकटाच कसा? त्याची आई कुठे आहे?’ कबीरला वाटले. तेवढ्यात ढोलूने सांगितले सकाळपासून आई दिसली नाही. तो आईलाच शोधत आहे. कळपातील सर्वजणच आईला शोधत आहेत. आणि मग गोट्या म्हणाला, ‘चला, आपण तिघे शोधू. मी झाडावर उंच चढेन आणि शोधेन. मग ते तिघे जंगलात ढोलूच्या आईला शोधू लागले. अधूनमधून गोट्या झाडावर उंच जाई आणि आजूबाजूला बघे. असे करता करता एके ठिकाणी गवतावर त्याला ‘ढोलूची आई झोपलेली दिसली. तिघे भरभर आईजवळ गेले. आई बेशुध्द पडली होती. ढोलू आईजवळ गेला. सोंडेने तो आईला उठवू लागला. पण आई उठेना. कबीरने ढोलूला शांत केले. ढोलूच्या डोळ्यातून पाणी येत होते आणि मग कबीरला ते दिसले. ढोलूच्या आईचा एक दात अर्धा तुटला होता. कबीरला ढोलूच्या आईचे दात खूप आवडत असत. ते मोठे, चमकदार आणि वळणदार होते. सुंदर होते. पण आता तुटलेला अर्धा दात खूप कसातरीच दिसत होता. कबीर गप्प बसला. त्यांनी प्रथम आईला शुध्दीवर आणण्याचे ठरविले. तळ्यातून पाणी आणून आईवर टाकले. थोड्या वेळाने ती जागी झाली. उठून बसली. ढोलूला खूप आनंद झाला. तेवढ्यात कळप पण तेथे आला. ढोलूने त्यांच्या भाषेत ओरडून त्यांना बोलावले होते. जंगलातील इतर प्राणी सुद्धा एकमेकांना संदेश देत असत. कबीरला हे सर्व कळले होते.
आता संध्याकाळ झाली होती. ढोलूची आई म्हणाली, ‘गोट्या, कबीर तुम्ही घरी जा.’ मग ते दोघे तेथून निघाले. ‘गोट्या, आईचा दात बघितलास का?’ कबीरने विचारले, ‘हो, मला दिसले. त्यासाठीच ढोलूच्या आईला त्या वाईट्ट लोकांनी लांब नेऊन बेशुध्द केले’ गोट्या म्हणाला. कबीरला खूप वाईट वाटले. माणसे अशी का वागतात?
नदी ओलांडून कबीर घरी आला. त्याने आई-बाबांना सर्व सांगितले. ‘हत्तीचा दात त्या लोकांनी का नेला?’ कबीरने आईला विचारले. ‘कबीर, हत्तीच्या दातापासून म्हणजे हस्तीदंतापासून लोक वस्तू बनवितात. कानातले, गळ्यातले दागिने, बटण इ… त्याला खूप किंमत मिळते. म्हणून ते दात चोरून नेतात. कबीरला खूप वाईट वाटले. ‘कबीर, आपण जर हस्तीदंती वस्तू विकतच घेतल्या नाहीत तर त्या लोकांना त्या विकताच येणार नाहीत. मग ते असे करणार नाहीत.’ बाबा म्हणाले.
तेव्हाच कबीरने शपथ घेतली – ‘मी कधीच हस्तीदंती वस्तू विकत घेणार नाही.’

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016