Skip to main content

शांत निश्चयी सुवर्णा

आयुष्यातला प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो असं आपण लहानपणापासून ऐकत आलो. “प्रत्यक्षात विविध अनुभवांना सामोरं जाताना आपण त्यातून कोणते धडे घेतले?” असं एखाद्याला विचारलं तर त्याला गोंधळून जायला होईल. पण काही व्यक्ती मात्र त्यांच्या आयुष्यातील विविध घटना व प्रसंगांची आठवण ठेवून, त्यातून मिळालेले धडे सुद्धा तटस्थपणे सांगू शकतात. त्यानुसार आपल्या वर्तनात बदल करू शकतात,  आपल्याच मनाशी काही निर्णय घेऊन ते अमलातही आणू शकतात, पर्यायाने त्यांच्या जीवनाची दिशा ठरू शकते, बदलू शकते. अशीच आहे आपली तरूण मैत्रीण सुवर्णा- सुवर्णा अभिषेक जाधव.

एक वर्षापूर्वी आपल्या क्लबच्या रोहा येथे गेलेल्या ट्रीपमधे सुवर्णाची जास्त ओळख झाली. लहानग्या स्वराजला घेऊन आलेल्या सुवर्णा अभिषेक ने ट्रीप छान एंजॉय केलीच पण दीड वर्षाच्या स्वराजनेही त्याला गाडीत उलट्या होत असूनही अजिबात रडारड केली नाही हे विशेष! सुवर्णा अभिषेकनेही हे सारं शांतपणे निस्तरलं.

तर ही सुवर्णा मूळची सुवर्णा क्षीरसागर, श्रीगोंदा तालुक्यातील ‘अजनुज’ या गावातली. तिचे आई बाबा दोघांनीही सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळलेली. त्यामुळे घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा खूप राबता. घरातलं कुटुंबही १४/१५ जणांचं. सुवर्णाचे आई बाबा, २भाऊ, काका काकू, चुलत भावंडं, आजी आजोबा, दोन पणज्या. वडील घरची मोठी शेती संभाळणारे शेतकरी पण सुधारक आणि प्रगत विचारांचे, कडक शिस्तीचे. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःला शिक्षणाची पुरेशी संधी मिळाली नाही पण मुलांनी मात्र खूप शिकावे या विचारांचे. त्यामुळे गावातल्या शाळेत दहावी झाल्यानंतर सुवर्णा श्रीगोंदा येथे वसतिगृहात राहून १२वी झाली. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी सासवड येथे चार वर्ष ती 

वसतिगृहात राहिली. तिने फार्मसीची पदवी उत्तम मार्कांनी संपादित केली, सुवर्ण म्हणते, “आई वडिलांनी सक्रिय पाठिंबा दिला, त्यामुळेच मी बाहेरगावी वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करू शकले”. मुलीने नुसते शिक्षण पूर्ण करावे एवढेच नव्हे तर तिने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे सुवर्णाच्या वडिलांना तीव्रतेने वाटत असे. वडिलांच्या अशा विचारांमुळे सुवर्णाच्या मनात लहानपणापासूनच आपण शिक्षण झाल्यावर नोकरी करायचीच असा विचार रुजला होता. त्यादृष्टीने शिक्षण पूर्ण व्हायला हवे या भावनेतून ती वयाच्या १५-१६ व्य वर्षीहि वसतिगृहात राहण्याचा स्वीकार करू शकली. अन्यथा १०-१५ जणांच्या कुटुंबात राहणाऱ्या सुवर्णाला बाहेरगावी, वसतिगृहात राहणं सोपं गेलं नसतं. 

वसतीगृहातल्या विविध अनुभवांमुळे, स्वतंत्रपणे राहिल्यामुळे, मुलींचे विविध नमुने पाहायला मिळाल्यामुळे जे अनुभव आले ते आयुष्यभर पुरणारे आहेत असं सुवर्णाला वाटतं. त्या काळात आपण केलेलं उत्तम  काम लोकांसमोर ‘आपणच केलेलं आहे ‘ हे येणं किती महत्वाचं आहे ह्याची जाणीव झाली. अन्यथा आपलं श्रेय दुसरे कसे हिरावून घेतात याचाही अनुभव आला. त्यामुळे ह्याविषयी जागरूक राहायची गरज तिला कळली. घरापासून लांब राहण्यामुळे स्वतः सगळे निर्णय घेणं, विविध स्वभावाच्या मुलींशी जुळवून घेणं, वेळ, अभ्यास, पैसे असं सगळं मॅनेज करणं हे जसं जमू लागलं तसा आपला आत्मविश्वास वाढल्याचं सुवर्णाने सांगितलं. शेक्षणिक वर्षांमध्ये तिने ‘पोस्टर पेंटिंग’ पासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. ती कबड्डी खेळाडूही होती. तिने विविध स्तरावरच्या स्पर्धा गाजवल्या. त्या काळात एकदा ती नववीत असताना झालेल्या मॅचेस मधील यशाबद्दल तिला सरपंच असलेल्या तिच्या वडिलांच्या हस्तेच पारितोषिक घेण्याची संधी मिळाली, तेंव्हा तिला अपार आनंद झाला. तो आनंद ती विसरूच शकत नाही.

पदवी परिक्षेची चार वर्ष तिला पूर्ण करायची असताना तिसऱ्या वर्षातच तिचा विवाह ठरला आणि लगेच पारही पडला. पण शिक्षण पूर्ण करण्याचा तिचा निश्चय इतका पक्का होता की सासरच्या सर्व मंडळींनीही तिला पाठिंबा दिला आणि राहिलेलं दीड वर्ष पूर्ण करण्यासाठी तिला सासरी पुण्यात न राहता, सासवडला वसतिगृहातच रहाण्याला अनुमती दिली. त्यामुळे तिची पदवी परीक्षा ती यशस्वीपणे पूर्ण करू शकली. त्यानंतर तिने सिंबायोसिसला एम बी ए साठी प्रवेश घेतला. पण स्वराजच्या जन्मामुळे तिला एम बी ए ची परीक्षा देणं अशक्य झालं. पुढे तिने एका औषधाच्या दुकानात सहा महिने काम केलं, तसंच देवयानी हाॅस्पिटलमधे दीड वर्ष रात्रपाळीसह नोकरी केली.
त्यानंतर तिच्या दिराच्या पुढाकाराने तिने तिचं कामाचं क्षेत्र बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला. फार्मसी तून तिने ‘आयटी’ क्षेत्रात प्रवेश केला. हा निर्णय खूप अवघड होता. मनात सुवर्णाला खूप धाकधूक वाटत होती. पण तिचे दोन्ही भाऊ, दीर, स्वतः अभिषेक सर्वांनी तिला प्रोत्साहन दिलं. सुवर्णाच्या मनात तर नोकरी करणं हे पक्कंच होतं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी चालतील. सुवर्णाच्या आई वडलांचा तर पूर्ण पाठिंबा होताच. तेव्हा सुवर्णाने हे धाडसी पाऊल उचललं आणि मे २२ मधे ती कॅपजेमिनी या कंपनीत रिक्रूटमेंट अधिकारी म्हणून काम करू लागली.

सुवर्णा म्हणाली, “त्यावेळी मनावर फार फार दडपण होतं. कामाचं क्षेत्र नवीन होतं, त्या विषयाचा अभ्यास नवीन होता, सहकारी नवीन होते. त्यातच छोट्या स्वराजला घरी ठेवून जाण्याचा मनाला फार त्रास वाटे. सासू, सासरे, अभिषेक सगळे मदत करत होते, स्वराजला संभाळत होते, ह्याचाही मनावर खूप ताण येई. दिवसभर ऑफिस झाल्यावर घरी येऊन घरचं काम पाहण्याची गरज मला स्वस्थता देऊ शकत नसे. त्यामुळे घरी आल्यावर स्वराजकडे पाहणं आणि घरातलं काम असं दोन्ही मला करायचं असे. पण सर्वांच्या पाठिंब्याने मला उभारी येई आणि मी नव्या उत्साहाने कामाला लागे”. अर्थात ह्या कसोटीच्या काळाने मला खूप घडवले असं सुवर्णा सांगते. ती म्हणाली, “माझा आत्मविश्वास तर वाढलाच पण सासरच्या मंडळींनीही माझी चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, घरच्या जबाबदाऱ्या संभाळण्याची इच्छा आणि क्षमता सारं सारं जाणवत राहिलं. मीही त्यांच्यात अधिकाधिक रूळून गेले. माझ्या आई वडिलांप्रमाणेच सासू सासऱ्यांनाही करण्याने जसं खूप समाधान मिळत होतं त्यापेक्षाही जास्त आनंद स्वराजच्या आगमनाने झालेला होता. त्यामुळे तो कसोटीचा काळ छान निभावला गेला”.

दरम्यान अभिषेकने नोकरी सोडून वडिलांचा पेंटिंगचा व्यवसाय पुढे चालविण्याचा निर्णय घेतला होता. तो त्याच्या कामात बुडून गेला. पण तेंव्हाच त्याने सुवर्णाला आवश्यक ती मदत केली, तिला संपूर्ण पाठिंबा दिला, वेळोवेळी तिला धीर दिला, समजून घेतलं. तिचा साधा सरळ स्वभाव तिला गोत्यात आणू शकतो, आणतो, हे जाणून अभिषेकने तिला वेळोवेळी सावध केलं, माणसांची पारख करण्यात मदत केली, याचा सुवर्णाने आवर्जून उल्लेख केला.
कोणतीही गोष्ट करताना सौंदर्यपुर्णतेने करण्याचा सुवर्णाचा कटाक्ष असतो. तिची ही कलात्मकता, चोखंदळपणा तिच्या सासुबाईंना खूप आवडतो. त्यांनाही तशीच आवड असल्याने त्या तिला नेहमी प्रोत्साहन देतात, मदत करतात असं सुवर्णाने सांगितलं. विद्यार्थी दशेत असताना सुवर्णाने पेंटिंग स्पर्धांमधे पारितोषिके मिळवली आहेत. तसेच पाककलेचीही तिला आवड आहे. घरी वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची तिला हौस आहे. तिच्या ह्या प्रयोगशीलतेला घरातील मंडळी प्रोत्साहन देत असल्याने तिचा उत्साह द्विगुणित होत असल्याचं तिने स्पष्ट केलं. सुवर्णा माहेरी खूप मोठ्या कुटुंबात रहात होती. सासरीही ती एकत्र कुटुंबात रहाते, रमते. पण मूलतः तिला शांततेची आवड आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात तिला खूप आवडतं.

तिने मुळात फार्मसीची पदवी घेतलेली आहे. अभिषेकनेही ती पदवी घेतली आहे. तिचा दीर फिजिओथेरपिस्ट असून सध्या लंडनमधे काही विशेष प्रशिक्षण घेत आहे. त्याच्याच पुढाकाराने सुवर्णा सध्या आयटी क्षेत्रात काम करत आहे. पण तो भारतात परत आल्यावर फार्मसी च्या क्षेत्रात काही करता आलं तर तेही करण्याचा तिचा मानस आहे.
याशिवाय तिला आणि अभिषेकला समाजकार्याचीही आवड आहे. त्यातही काही करता यावे ह्या हेतूनेच ते आपल्या रोटरी क्लबमधे आले आहेत आणि वेळोवेळी क्लबच्या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेत आहेत. या सगळ्याच आघाड्यांवर शक्य तेवढे काम करीत राहण्याचा सुवर्णाचा मानस आहे.
“मला माझं जीवन जगू दे आणि तुम्हीही तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं जगा” हे तत्व सुवर्णाला मान्य आहे. ‘तिला तिच्या तत्वाप्रमाणे जीवन जगायला मिळू दे’ हीच आपल्या सर्वांतर्फे तिला शुभेच्छा.

ॲन सरिता भावे

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016