Skip to main content

मनस्वी अलका

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, या आपल्याकडच्या म्हणीप्रमाणे खरंच व्यक्ती व्यक्तीत आपल्याला फरक आढळत असतात. हे फरक कितीही असले तरी एक गोष्ट प्रत्येक व्यक्तीत समान आढळते, ती म्हणजे प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याच्या स्वतःच्या मानाप्रमाणेच घडावी असं वाटत असतं. अर्थात असं घडण्यासाठी त्या व्यक्तीला काही खटपट करावी लागते, काही कष्ट घ्यावेच लागतात. शिवाय ती व्यक्ती जिद्दीची असेल, धडाडीची असेल, आशावादी असेल तर गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडण्याची शक्यता वाढते. नाहीतर आपल्याकडे म्हणतातच ना कि नशिबात असेल तेच घडतं! आणि आपल्या प्रत्येकालाच प्रतिकूल गोष्टी घडण्याचाही अनुभव असतोच. असो. तर अशीच जिद्दीची, आशावादी आणि धडाडीची आहे आपली मैत्रीण अलका – अलका कांबळे. आपलं जीवन, आपलं आयुष्य हे आपल्याला हवं तसंच जगण्याची कल्पना तिच्या मनात पक्की आहे, किंबहुना अशा विचारांवरच तिची जडणघडण झाली आहे आणि तिने आत्तापर्यंतचं आयुष्यही असंच व्यतीत केलं आहे. 

अलका मुळची कोल्हापूरची, अलका पोतदार. आई वडील दोघेही पत्रकारितेत, आणि अलका चार भावंडांमधली थोरली. अलकाच्या आईने जर्नालिझमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं, आणि वडिलांनी काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर स्वतःचा प्रेस चालविला. शिवाय वडील डाव्या चळवळीत काम करणारे. साहजिकच अलकाच्या घरी वातावरण खूप मोकळं होतं. घरी चळवळीतले कार्यकर्ते, तसेच राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं येणं जाणं खूप होतं. अलकाही ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ ह्या संघटनेची काही वर्षे कार्यकर्ती होती.  याप्रमाणे डाव्या चळवळीशी त्यांचं घर निगडीत होतं तरीही वडिलांचे विचार, वडिलांचा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे मध्यममार्गी होता असं अलकाने सांगितलं. ती म्हणाली, “मला आणि दोघी बहिणी व भाऊ सर्वांनाच मित्रमैत्रिणी भरपूर होते. सगळ्यांचं आमच्या घरी खूप येणं जाणं असे. घरात चर्चा आणि गप्पा चालूच असत. शाळा कॉलेजमधेही मी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वक्तृत्व स्पर्धांमधे नेहमीच सहभागी असे. आई वडिलांमुळे मला वाचनाची खूप आवड लागली. तसेच व्याख्याने ऐकणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे, नाटक पाहणे हे सारे आमचे चालूच असे. शाळा कॉलेजच्या सहलींमध्ये सहभागी होण्यास आई वडिलांचा पूर्ण पाठिंबा असे. अशा साऱ्या वातावरणामुळे माझं घराबाहेर वावरणं, हिंडणं, फिरणं खूप झालं.” 

अशोकची ओळख कशी झाली ते सांगताना अलका म्हणाली, “अशोक खरं तर माझ्या बहिणीचा मित्र. ते दोघे एका नाटकात काम करत होते. त्यामुळे त्याचं आमच्या घरी येणं  जाणं होई. मग सर्वांच्याच गप्पा होत. विद्यापीठातही आमची भेट होई. अशोक एम एस्सी इलेक्ट्रॉनिक्स करत होता. त्याला नाटकाची खूपच आवड होती. त्यामुळे आमचा परिचय झाला. अशोक खूपच सिन्सिअर, आणि मेथॉडिकल आहे. स्वभावाने भिडस्त आणि मृदू आहे. त्याचे वडील दलित पँथरचे काम करायचे आणि मिलमध्ये नोकरी. त्यामुळे अशोकचाही सामाजिक चळवळी, कार्यकर्ते इत्यादी गोष्टींशी जवळून संबंध होता. त्याला स्वतःचं शिक्षण स्वबळावर करावं लागलं. त्यामुळे त्याला कष्टांची सवय होती.” 

अलकाच्या घरी आई वडिलांना जातपात, धर्म, पंथ, इत्यादी गोष्टींचं सोयर सुतक नव्हतं. कोणीही व्यक्ती ‘माणूस’ म्हणून कशी वागते ह्यालाच ते महत्व देत. त्यामुळे त्यांनी मुलींना जोडीदार कोणीही असला तरी चालेल पण तो निर्व्यसनी असावा, शिकलेला असावा, त्याची मूल्य चांगली असावीत असा सल्ला दिला. त्यानुसार अलकासह तिच्या दोन्ही बहिणींनीही आंतरजातीय प्रेमविवाह केले आहेत. तिची एक बहीण वकील आहे तर दुसरी प्राध्यापक आहे. अलकानेही विवाहाआधी बारामतीला विद्या प्रतिष्ठानमध्ये एक वर्ष नोकरी केली. विवाहानंतर मात्र अलका व अशोक दोघांनीही पुण्यात मॉडर्न कॉलेजमध्ये नोकरी स्विकारली  ती आजतागायत. अशोक इलेक्ट्रॉनिकस चा पदवीधारक असला तरी त्याला आपल्या नोकरीशिवाय एन सी सी, नाटक आदी कलाप्रांतात रममाण व्हायचं असतं. त्यासाठी सवड मिळावी म्हणून त्याने प्राध्यापकाची नोकरी निवडली असल्याचं अलकाने स्पष्ट केलं.

लग्नानंतर नवरा कोणीही असो पण आपण नवऱ्याच्या पारंपरिक कुटुंबात राहू नये तर दोघांनी स्वतंत्र राहावं असा विचार प्रथमपासूनच अलकाचा पक्का होता. त्यानुसार लग्नानंतर तिने अशोकचे आई वडील व भावंडांसमवेत राहण्यास नकार दिला आणि ते स्वतंत्र घरात राहू लागले. अलका म्हणाली, “अशोकचे आई वडील खूप साधे, सरळ आणि जमवून घेणारे आहेत. नव्या, वेगळ्या विचारांना, वेगळ्या गोष्टींना समजून घेणारे आणि स्वीकारणारे आहेत. पण लग्नाविषयीच्या माझ्या विचारात प्रथमपासूनच  माझ्या पद्धतीने स्वतंत्र रहाण्याचीच माझी कल्पना होती. त्यामुळे मी त्याच्या कुटुंबात राहायला जाण्याचं नाकारलं. अन्यथा आमचे सर्वांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. 

अशा प्रकारे स्वतःला जे पटेल, जे आवडेल, जे जमेल आणि जे रुचेल, तेच करू इच्छिणाऱ्या बालकाचा मुलगा, अर्णव, तिच्यासारखाच स्वतंत्र विचारांचा, आणि आपल्या विचारांवर ठाम असणारा आहे. त्याने येथे एल एल बी पूर्ण केले असून आता तो कॅनडामध्ये तेथील कायद्याचा अभ्यास करत आहे. मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापक असणारे अलका व अशोक त्यांच्या अध्यापनाच्या कामाखेरीज कॉलेजच्या इतर अनेक उपक्रमात सहभागी असतात. अर्थात त्यासाठीच त्यांनी कॉलेजची नोकरी निवडली आहे. नोकरीनंतर दोघांनाही कलाप्रांतात काही करण्याची मनापासून ईच्छा आहे. आहोम तर नाटकात रमणारा आहे आणि अलकाला मात्र तिची नृत्याची आवड पूर्ण करायची आहे. शिवाय तिला एकतरी परदेशी भाषा शिकायची आहे. उत्तम साहित्याची भाषांतरे करण्याची तिची इच्छा आहे. शिवाय परवा तर दोघांच्याही आवडीचा आहे. याखेरीज सामाजिक कार्यातही दोघांना हातभार लावण्याची इच्छा आहे. सामाजिक कार्य, आणि नाटक किंवा इतर सांस्कृतिक उपक्रमात उपक्रमात सहभागी व्हावं ह्या हेतूनेच त्या दोघांनी आपल्या क्लबचं सभासदत्व घेतलं. ते दोघेही शक्य त्या क्लबच्या उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता तर अलकाने क्लबचं अध्यक्षपदही स्वीकारलं आहे. त्यामुळे तिच्या रूपाने आपल्याला एक धडाडीचं, स्वतंत्र विचारांचं नेतृत्व उपलब्ध झालं आहे हे निश्चित. त्या दोघांनाही त्यांच्या सर्व कार्यात आपल्या सगळ्यांतर्फे मी शुभेच्छा व्यक्त करते.

ॲन सरिता भावे

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016