Skip to main content

साज और आवाज

 पी पी शिरीष क्षीरसागर

हिंदी सिनेमातली गाणी ,हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय. त्यातून जुनी हिंदी गाणी , म्हणजे हिंदी गाण्यांच्या सुवर्णकाळातली गाणी, म्हणजे जीव की प्राण! आपली पिढी या जुन्या हिंदी गाणी ऐकता ऐकता मोठी झाली. आजही ती गाणी ऐकली की, तो आपला काळ डोळ्यासमोर उभा राहतो!
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीची गाणी, त्यावेळेला लोकप्रिय होतीच पण आजही ती तितकीच आपल्या मनाला आनंद देतात !
एखादे गाणे लोकप्रिय होण्यामागच्या कारणांचा विचार केला तर लक्षात येतं ,की ते गाणं निर्माण करायला अनेकांचे हात लागलेले असतात. या मध्ये ते गाणं गाणारे गायक, संगीतकार, संयोजक ,वादक आणि पडद्यावर दिसणारे नायक नायिका यांचा मोठा वाटा असतो !

लोकप्रिय गाण्याची व्याख्या करताना सचिनदा बर्मन म्हणाले होते की, जे गाणं गुणगुणताना त्याची चाल शब्द …. आणि मधले म्युझिक पिसेस हे सगळं आठवतं ,ते गाणं लोकप्रिय . दादांची गाणी अशीच असायची!

हिंदी गाण्यात त्याच्या चालीबरोबर आणि शब्दांच्या बरोबरीने त्यात वाजवणारे म्युझिक पण तितकेच महत्त्वाचे असते. त्यामध्ये वाजली जाणारी वाद्ये गिटार ,अकॉर्डियन, ट्रंपेट यासारखी पाश्चात्त्य वाद्य असतात त्याचबरोबरीने सतार, बासरी ,संतूर आणि सनई यासारखी भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्ये पण असतात.

त्या काळातल्या सर्व दिग्गज संगीतकारांनी अशी भारतीय आणि पाश्चात्य वाद्ये वापरून हिंदी सिने संगीत समृद्ध केलं.

या महिन्यात सुरू होत असलेल्या “साज और आवाज” या सदरातून मी तुम्हाला अशा हिंदी गाण्यांची आठवण करून देणार आहे ज्यात प्रामुख्याने भारतीय वाद्यांचा उपयोग केला आहे.

चित्रपट संगीतात त्या मानाने कमी वापरले जाणारे पण प्रसंगाला पोषक असा भाव निर्माण करणारे एक वाद्य म्हणजे
सनई!

आपल्याकडे कोणताही मंगल प्रसंग किंवा सण असला की हमखास वाजवले जाणारे वाद्य म्हणजे सनई ! या सनईच्या सुरांनी समारंभाचे वातावरण मंगलमय ,पवित्र होऊन जाते . आणि सनई ऐकू आली की एकच नाव डोळ्यासमोर येतं – खां साहेब , बिस्मिल्ला खान. बनारसच्या देवळांमधून पूजेच्या वेळी वाजवलं जाणार हे पारंपारिक वाद्य बिस्मिल्ला खान यांनी भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं!!

मित्रांनो ,१९५९ साली आलेला राजेंद्रकुमार – अमिताचा “गुंज उठी शहनाई” सिनेमा आठवतोय? सिनेमाचा हिरो सनई वादनकार आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेमाभर आणि गाण्यांमध्ये सनईचा भरपूर संचार आहे. आणि ही सनई वाजवली आहे साक्षात बिस्मिल्ला खां यांनी !

मुळातच हे वाद्य वाजवायला खूप कठीण आहे, त्यातून ते सिनेमातल्या गाण्यासाठी तीन मिनिटांसाठी वाजवायचं हे तर अजूनच कठीण काम! संगीतकार वसंत देसाईंनी कॉम्पोझ केलेल्या सनई च्या पिसेस मध्ये खा साहेबांनी अक्षरशः जान ओतली आहे.
“तेरे सूर और मेरे गीत” या लतादीदींच्या गाण्यात खाॅ साहेबांनी सनईतून व्यक्त केलेल्या प्रेमभावना लाजवाब !!

सनईचा मुक्त वापर केलेलं अजून एक गाणं, राजेंद्र कुमारच्या सूरज मधलं “बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है “

हिरो राजेंद्रकुमार च्या साठी हा मंगल क्षण आहे आणि म्हणूनच तेथे हे मंगल वाद्य अतिशय चपखल पणे वापरलं आहे . शंकर जय किशन या जोडीचं अप्रतिम संगीत संयोजन आणि रफी साहेबांचा मधाळ आवाज यांच्या बरोबरीने वाजवलेली सनई तुम्हाला नक्कीच आनंद देईल. फिल्म जगतात “रवी” हे एक श्रेष्ठ संगीतकार होऊन गेले. त्यांच्या “नीलकमल” या सिनेमातलं रफी साहेबांनी गायलेलं गाणं – “बाबुल की दुवाये लेती जा” हे गाणे ऐका.

आता संगीतकाराचं कसब बघा हं , सनई हे वाद्य ,
आनंदाच्या प्रसंगी वाजवले जाणारं वाद्य. पण रवीसाहेबांनी या गाण्यात, लग्न होऊन सासरी निघालेल्या मुलीच्या बिदाई प्रसंगी , सनई या वाद्याचा इतका सुंदर वापर केला आहे, की गाणं ऐकताना तुमच्याही डोळ्यात टचकन पाणी येईल. मोहम्मद रफी यांच्या आवाजाबद्दल काही बोलायलाच नको, इतका अप्रतिम आवाज लागला आहे की बस्स !!!

जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं अजरामर मराठी भावगीत “भातुकलीच्या खेळा मधले… “ यात वाजलेली करुणरसपूर्ण सनई , ‘डाव अर्ध्यावर मोडल्याचा ‘भाव प्रभावीपणे व्यक्त करते.

मित्रांनो या सनईच्या गाण्यांची यादी खूप मोठी आहे पण जागे अभावी आत्ता थांबतो. पुढच्यावेळी भेटूया एक नवीन वाद्य घेऊन!

पी पी शिरीष क्षीरसागर

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016