होम मेकर्स आणि बरंच काही

सेवानिवृत्त व्यक्ती म्हणजे त्याच्या करिअरची समाप्ती असं सर्वसाधारण गृहीत . आजकालच्या व्ही. आर. एस. च्या जमान्यात सुद्धा या गृहितात तुरळकच फरक आढळतो . म्हणजे व्ही आर एस नंतर अनेकजण काही ना काही करत असतात, पण त्यामध्ये त्यांचं मूळ जे करिअर होतं त्याचं थोडं बहुत काम किंवा सोशल वर्क किंवा एखादी हॉबी असं त्याचं स्वरूप आढळतं. निवृत्तीनंतर मूळ करिअर पेक्षा पूर्णतः वेगळ्याच करिअरची उभारणी केलेली क्वचितच दिसते. असं वेगळ्याच करिअरमध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या ज्या तुरळक व्यक्ती आढळतात त्यात आपल्या एका मैत्रिणीचाही समावेश आहे बरं का !ती म्हणजे वृंदा…  वृंदा वाळिंबे. 

वृंदा ने व्ही आर एस घेतली ती लायब्ररीयन म्हणून. त्यानंतर ती आता पूर्ण वेळ काम करते आहे ते “कौन्सिलर” म्हणून. आजकालच्या “भयंकर” स्पर्धेच्या आणि “व्यक्तीस्वातंत्र्य” कल्पनेचा अतिरेक होण्याच्या काळात, लहानांपासून थोरापर्यंत अनेक जण भंजाळून गेलेले दिसतात. त्यांना “नॉर्मल” जीवन जगण्यासाठी खरोखरच कौन्सिलिंगची गरज असते. हेच काम आता वृंदा करत आहे.

वास्तविक वृंदाने कॉलेज जीवनात पदवी घेतली ते या कौन्सलिंगचा पाया असलेला “मानसशास्त्र” विषयातच. पण त्यावेळी पदवीनंतर पुढे काही शिक्षण, नोकरी असं न करता ती सरळ विवाहबंधनातच अडकली!

आजची वृंदा पाहता हे कसं काय घडलं किंवा त्यावेळी तिच्या काय मनात होतं ? असं विचारता वेगळंच चित्र पुढे आलं!  त्यावेळी वृंदा अबोल होती. अजिबात पुढे पुढे न करणारी ; किंबहुना मागे मागेच राहणारी आणि घरात तीन बहिणीतली थोरली होतीतेव्हा पदवी शिक्षण झाल्यावर पालकांच्या इच्छेनुसार लग्नाला तयार झाली आणि लग्नही लगेच ठरल्याने लग्न करून वृंदा पांडेची वृंदा वाळिंबे होऊन संसाराला लागली!

त्यावेळी वृंदाच माहेरही मुंबईतच होतं आणि सासरही. वृंदाचे वडील सरकारी वकील होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे वृंदाचा लहानपण अनेक गावात गेलं. उमरगा, उस्मानाबाद, लातूर, नगर आणि मुंबई. वृंदाला लहानपणापासून वाचनाची आवड होती. त्यामुळे लग्नानंतर घरात रिकामं बसण्यापेक्षा काही नोकरी करावी असा विचार पुढे आला, तेव्हा तिने नोकरी मिळायला सुलभ आणि एका वर्षातच होणारा, शिवाय मुळात वाचनाची आवड, या गोष्टी लक्षात घेऊन लायब्ररीयनचा कोर्स केला. तिला लगेच भगुबाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरीही मिळाली. त्यावेळी किरण “महेंद्र अँड महेंद्र” कंपनीत नोकरी करत होता. त्यानंतर १९८३ मध्ये नोकरी सोडून त्याने स्वतःचा उद्योग पालघरला सुरू केला. तेव्हा वृंदा घरचंमुलांचं आणि आपली नोकरी सांभाळून किरणला त्याचं टायपिंग सर्व काम करून देई.  पुढे १९९४ मध्ये किरण ने स्वतःचा व्यवसाय बंद करून पुण्याला “बजाज” मध्ये नोकरी घेतली तेव्हा ते मुंबई सोडून पुण्याला आले.  इथे आल्यावरही वृंदा ने ए. आर. ए .आय , तसंच मिटकॉन मध्ये नोकरी केली. पुढे तिची मुलगी मृण्मयी हिच्या लग्नाच्या वेळी म्हणजे २००३ मध्ये वृंदाने नोकरी सोडली.

नोकरीच्या काळातही वृंदाने सोशिओलॉजीत एम ए केलं.  तसंच ओरॅकल, डी बेसलायब्ररी ऑटोमेशन इत्यादी बाबत शिक्षण घेतलं.  वृंदा म्हणाली , “माझ्या आईची इच्छा मी डॉक्टर व्हावं अशी होती. पण मेडिकल पासून अगदी दूर अशा विषयांचा मी शिक्षण घेतलं.  शिवाय आई गाणं, भरतनाट्यम नृत्य, शिवण, भरतकाम , पेंटिंग या साऱ्यात तरबेज होती. ती बीएससी होती.  पण तिच्याकडून त्यावेळी मी तिच्या कलागुणातलं काहीच शिकून घेतलं नाही. तिनेही कधी मला जबरदस्ती केली नाही. “

अर्थात त्यावेळी वृंदाने आईकडून काही शिकून घेतलं नाही तरी आपल्या क्लब मध्ये आल्यावर  तिने नृत्य ,नाट्य,गायन इत्यादी कार्यक्रमात नेहमी सहभाग घेतला आणि तिच्या या गुणांचा संवर्धन केलं.  आता तर ती एकांकिकांचं लेखनही करू लागली आहे.  कवयित्री तर ती शाळेच्या वयापासूनच आहे.  तिच्या कविता आपण वेळोवेळी ऐकल्या आणि वाचल्या आहेत.

वृंदा ने २००३ मध्ये नोकरी सोडल्यावर पाच सहा वर्ष ती घरी होती. २००९ मध्ये तिने फर्ग्युसन कॉलेजमध्ये कौन्सिलिंग बाबतचा शिकवण्यात येणारा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेव्हापासून ती या कौन्सिलिंगच्या  क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.  यादरम्यान सायकोथेरेपीत तिने मास्टर्स डिग्री घेतली.  तसंच Transactional Analysis यामध्येही मास्टर्स डिग्री घेतली.  सध्या ती ” आयसर” मध्ये कौन्सलिंग चे काम सांभाळत आहे.

 काही वर्षांपूर्वी पर्यंत आपल्या समाजात , कोणाला आपल्या वर्तणुकीबाबत सल्ला घ्यायला समूपदेशका कडे जायला लागतंयअसं ऐकू आलं की त्या व्यक्तीकडे समाजात वेगळ्या दृष्टीने पाहिलं जाई.  किंबहुना ते शक्य तेवढं गुप्तही राखलं जाई.  त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञकडे जाणाऱ्यांची गोष्टच सोडा! त्यांच्या समस्यांना ढोबळमानाने “वेडेपणा” तच गणलं जाई.

वास्तविक काही जणांना धकाधकीच्या जीवनातले ताण तणाव कसे पेलावेत्यांना सामोरे कसे जावे हे उमगत नसतं.  त्यामागे त्यांच्या चुकीच्या कल्पना ;गैरसमज, काळजी करण्याचा स्वभाव, अवास्तव अपेक्षास्वतःच्या क्षमतांची जाणीव नसणं अशी विविध कारणं जबाबदार असतात. हे सारं त्या व्यक्तीपुढे उलगडून त्याला समजावून दिलंत्याच्यापुढे त्याच्या समस्यांचं वास्तव चित्र उभं केलं तरी तो बऱ्याच प्रमाणात स्वतःला सावरू शकतो , आवश्यक त्या उपायांचा, मार्गांचा अवलंब करू शकतो आणि स्वतःच्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो.  

आता सध्याच्या काळात या गोष्टींकडे कोणी भुवया उंचावून पाहत नाही. उलट कोणी सातत्याने टेन्शनमध्ये आढळलं तर त्याला आधी समुपदेशकाकडे- कौन्सिलरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. सध्याच्या काळात आपली जीवनपद्धती वेगाने बदलत आहे. जीवघेणी स्पर्धा,प्रचंड महागाई;विभक्त कुटुंब पद्धती , व्यक्ती स्वातंत्र्य कल्पनेचा वाढता पगडा वगैरेमुळे अनेकांना मानसिक ताण-तणावांनी बेजार केलेला आढळतं.  कोणी आर्थिक समस्यांनीकोणी कौटुंबिक समस्यांनी, कोणी नातेसंबंधातील गुंतागुंतकोणी कामाच्या ठिकाणच्या स्पर्धा आणि हेवेदाव्यांनी त्रस्त आढळतो.  तर अशा विविध प्रकारच्या समस्यांनी त्रस्त असलेले आणि विविध वयोगटातील तसेच विविध आर्थिकशैक्षणिक स्तरातले “क्लायंट्स” वृंदाला भेटत असतात. 

ह्या सर्व प्रकारच्या समस्याग्रस्तांना भेटणंत्यांच्या अडचणी ऐकणंत्यावर साधकबाधक विचार करून उपाय सुचवणे हे काम खरोखरच आपल्याही मानसिकतेची कसोटी पाहणारच असतं! गेली काही वर्ष सातत्याने ही “कसोटी” पार पाडणाऱ्या वृंदात स्वतःतही अनेक बदल होणं अपरिहार्य होतं. त्याविषयी बोलताना वृंदा म्हणाली, “माझा पेशन्स कितीतरी पटींनी वाढला. दुसऱ्याचं म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेण्याची क्षमता वाढली. तसेच समोरच्या   व्यक्तिचे   मत  आणि  विचार आपल्यापेक्षा वेगळे असू शकतात आणि त्याचाही शांतपणे स्वीकार केला पाहिजेही गोष्ट मनात बिंबली. त्यामुळे माझी “स्वीकार” वृत्ती वाढली. पर्यायाने विचारात सकारात्मकताही खूप वाढली. माझा स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलला, पर्यायाने इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. पूर्वी माझ्या मनात व्यक्तींबद्दलचे “ग्रजेस” असायचे. पण आता तसं होत नाही. मला अन्यायाबद्दल राग जरूर येतोकिंवा इतरांच्या वागण्या बोलण्याने मी स्वतः “हर्ट” नक्की होते पण तरीही संबंधितांबद्दल आता मनात “ग्रज” राहत नाही कारण तसा तो बाळगून मला काहीच फायदा नाही आणि संबंधित माणसाला त्याने काही फरक पडत नाही हे आता माझ्या मनात पक्क रुजलंय,त्यामुळे हे बद्दल माझ्यात होऊ शकले.” 

 या कौन्सिलिंग खेरीज आणखी एक वेगळंच काम वृंदा गेली अनेक वर्ष करत आहे.  आपल्या बाजारात सातत्याने देशी, परदेशी नवनवीन औषधे येत असतात.  त्याचे गुणावगुण , फायदे तोटे इत्यादीची माहिती औषधांसोबतच्या पत्रकांमध्ये दिलेली असते.  ती आपल्या मातृभाषेत असली तर सर्वांना समजायला सोपं जातं किंबहुना त्या औषधाची  योग्य ती माहिती संबंधितांना होऊ शकते.  त्या दृष्टीने काही अमेरिकन औषध कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती मराठीत योग्य तऱ्हेने भाषांतरित झाली आहे का नाही? हे पाहण्याचं काम वृंदा करते. 

याशिवाय आपल्या रोटरीच्या कामात ती किती हिरीरीने भाग घेतेहे आपल्या सर्वांना माहितीच आहे.

 तिची मुलगी, जावई अमेरिकेत असतात तर मुलगा सून भारतातच आपापल्या उद्योग व्यवसायात मग्न असतात.  प्रत्येकाला आपलं  आयुष्य कसं घालवायचं ,   कसं  घालवावं हे ठरवण्याचा अधिकार आहे आणि आपण तो मान्य केलाच पाहिजे.  हे कौन्सिलर असलेल्या वृंदाचं  तत्व असणं आणि त्यानुसार तिने तिच्या मुलांना संपूर्ण स्वातंत्र्य देऊ करणं यात काहीच नवल नाही.  ती म्हणते, “त्या चौघांनीही त्यांच  आयुष्य आनंदात घालवावा हीच माझी आणि किरणची इच्छा आहे.  त्यामुळे आम्ही एकमेकांना जसं स्वातंत्र्य देतो तसंच त्यांनाही देतो.  शिवाय त्यांना आमची गरज असेल तेव्हा आम्ही पालक म्हणून त्यांच्यासाठी मदतीला कायमच आहोतहा विश्वास त्यांना दिलेला आहे.” .असा  दृष्टिकोन  नातेसंबंध  उत्तम  राखण्यात  मदतशीलच  ठरत  असतो  हे  निश्चित. 

यानंतरच्या काळात कौन्सिलिंग बरोबरच प्रवास करण्याचा वृंदाचा विचार आहे. बाकी वाचन करणेसिनेमा पाहणंगप्पाटप्पा या हॉबीज आहेतच. 

वृंदाला यापुढेही सर्वत्र यश आणि आनंद लाभो हीच शुभेच्छा.

ऍन सरिता भावे