होम मेकर्स आणि बरंच काही

“जिद्दी आणि आनंदी” मीना

यशस्वी उद्योजकाच्या अंगी स्वतःचं काहीतरी उभं करून दाखवण्याची उर्मी किती प्रखर असते याचं एक उदाहरण म्हणजे आपली मैत्रीण मीना- मीना इनामदार.

आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साड्यांचा उद्योग ती गेली ३५ वर्ष किती नेटाने करत आहे हे, आपण पाहिलंच आहे.  या ३५ वर्षात मनाचा उत्साह मावळून जाईलअसे प्रसंग मीनाला सामोरे आले नाहीतअसं नाही.  पण ते पार करून तिने तिची वाटचाल सुरूच ठेवली!

मुळात मीनाला असे कष्ट करण्याची गरजच नव्हती.  तिचा जन्मच एका सुखवस्तु चौकोनी कुटुंबात झाला. आणि तिचं शिक्षण संपल्यावर उत्तम नोकरी तिच्या पुढ्यात  होतीही पण तिने ती निश्चयाने नाकारली होती. 

मीना मूळची मीना डोळे.  तिचा जन्म आणि विवाहापर्यंतच वास्तव्य मुंबईतच झालं.  तिचे वडील रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते. आई घरात ट्यूशन्स घ्यायची.  घरात मीनातिचा भाऊ आणि आई वडील.  तिचं घर त्यावेळी मुंबईतल्या एका उत्तम सोसायटीत होतं . लहानपणापासून मैत्रिणींच्या गराड्यात असणाऱ्या मीनाला खाणं, पिणंफिरणंखेळणंखरेदी , नाच , नाटकखेळवक्तृत्व अशा साऱ्या गोष्टीत खूप रस होता . आणि हे सार तिला मनसोक्त करायला मिळतही होतं. ती म्हणाली, ” आईची शिस्त कडक होती. पण शिस्त लावण्याची तिची पद्धत वेगळी होती.  आमची एखादी गोष्ट तिला आवडली नाही , पटली नाहीतरी ती आम्हाला रागवायची  नाही,ओरडायची नाही . ती फक्त आमच्याशी बोलणं बंद करायची.  मग तिचा तो अबोला आम्हाला असह्य व्हायचा.  ती म्हणायची, “मी तुम्हाला रागवणार नाही. तुमची तुम्हाला चूक झाली हे पटायला हवं म्हणजे पुन्हा तुम्ही ती चूक करणार नाही.”

शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच मीनाला कलात्मक वस्तू बनवण्याची आवड होती.  त्यामुळे रुखवताला लागणाऱ्या अशा वस्तू बनवून देण्याच्या ऑर्डर्स तेव्हाही ती घेत होती आणि छोट्या प्रमाणावर का होईना पण हा व्यवसाय करत होती.  बी. ए. झाल्यावर तिचे वडील तिला रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी लावून घेण्यास उत्सुक होते. तिचा भाऊ पण तिथेच नोकरी करत होता.  पण मीनाने तेव्हाच वडिलांना स्पष्टपणे सांगितलं की, ” मी नोकरी कधीच करणार नाही.  मी स्वतःचा काहीतरी उद्योग करीन. ” या निश्चयाप्रमाणेच ती आणखीन एका गोष्टीवर ठाम होतीती म्हणजे तिला तिचा नवरा मुंबई बाहेरचाच हवा होता ! 

अर्थात तिच्या मनाप्रमाणे तिला सांगलीत घर असलेला पण पुण्यात राहणारा नवरा “अनिरुद्ध” मिळाला आणि ती पुण्यात आली. ती सांगते, “आम्ही पुण्यात राहत होतो पण आमचा प्रत्येक सणवार सांगलीला एकत्र कुटुंबात धुमधडाक्याने साजरा होई.”.  मीनाचे सासरे भाषातज्ञ होते , सासूबाई कॉर्पोरेटर होत्यादीर जाऊ डॉक्टर होते. त्यांची घरची शेतीवाडी होती.

 मीनाला स्वतःचा काही उद्योग करायची जी इच्छा होती त्याला तिचे सासरे आणि अनिरुद्ध यांच्याकडून खत पाणीच मिळालं.  त्या दोघांचंही म्हणणं होतं की,  “तू नुसतीच मिसेस इनामदार म्हणून राहू नको.  तू तुझी स्वतंत्र ओळख निर्माण कर.”

मीनाला स्वयंपाक करणं , विविध पदार्थ करून लोकांना खाऊ घालणं याची आवड प्रथमपासूनच होती.  त्याचबरोबर घर संसारलहान मुलांना रमवणंहे पण तिला आवडत होतं.  त्यामुळे तिचा मुलगा “स्वानंद” याला सांभाळतानाच इतर पाच-सहा लहान मुलंही त्याच्याशी खेळायला म्हणून येत  आणि मीनाच्याच घरी थांबत.  यातूनच तिला “रिक्रिएशन सेंटर” ची कल्पना सुचली आणि वर्ष , दोन वर्ष तिने मुलांसाठी “बलून” हे सेंटर चालवलं.  दरम्यान तिची एक मैत्रीण स्वतःच्या मैत्रिणींसाठी मुंबईहून साड्या आणून इथे विकत असे.  ते पाहून मीनालाही आपण असं करावं असं वाटू लागलं. मुंबईची तर तिला उत्तम माहिती होतीच.  तिने लगेचच या कामाला सुरुवात केली.

त्यावेळी नोकरी करणाऱ्या स्त्रिया सिंथेटिक साड्या नेसणं पसंत करत.  तेव्हा मीनाने अशा साड्या बँकाएलआयसी , इन्कम टॅक्स ऑफिसतसच शाळा वगैरे ठिकाणी नेऊन  विकायला सुरुवात केली. त्याला उत्तम प्रसिदात मिळू लागला. त्यामुळे तिचा उत्साह वाढला.  ती साड्यांच्या बँगा घेऊन रिक्षाने विविध ऑफिसांमध्ये रोज जाऊ लागली.  या सर्व व्यवहाराला लागणारं भांडवल स्वतःच जमा करण्याचा आणि त्यातूनच खर्च करण्याचा तिचा कटाक्ष होताच.  शिवाय हे काम करतानाच घरातलंही  सर्व व्यवस्थितपणे सांभाळूनच मगच  बाहेर पडायचंहे तर तिचं स्वतःचच तत्त्व होतं. मुळातच चोख हिशोब ठेवणंतो रोजच्या रोज लिहिणं , तसंच आपल्या कामाचं वेळेनुसार नीट नियोजन करणं , हे गुण तिच्या    अंगी जणू उपजतच होते.  त्यामुळे तिला हे अवघड वाटलंच नाही . भरपूर कष्टांची तयारीअंगात टाईम मॅनेजमेंट ची उत्तम शिस्तजिभेवर साखर  , सदैव पेरलेलीलोकांच्यात रमण्याचा स्वभाव त्यामुळे मीनाचा व्यवसाय वाढू लागला. तिच्या  सासर्‍यांनी तिला स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड तयार करूनते ती जाईल तिथे वाटण्याचा सल्ला दिला.  त्यातून साड्या घेण्यासाठी स्त्रिया तिच्या घरी येऊ लागल्या.

अशा तऱ्हेने व्यवसायाचा जम बसू लागलेला असतानाच तिला अपघात झाला आणि तिला जवळजवळ वर्षभर घरातच राहावं लागलं.  हा  “सेट बॅक” शारीरिक,मानसिक, आर्थिक सर्वच दृष्टीने मोठा वाटण्यासारखा होता.  पण मीनाचा सदैव आशावादी असलेला  स्वभाव ; तिची स्वामींवरची श्रद्धा आणि घरच्यांचा पाठिंबाया बळावर त्यातून ती नीट सावरली.  पुन्हा जोमाने कामाला लागली.  आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे पुन्हा तिच्या व्यवसायाने जोर पकडला.  त्यातच प्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांनी तिला, स्त्रियांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि भारतातच नव्हे तर परदेशी ही खूप खपणारं मासिक “माहेर” यामध्ये जाहिरात देण्याचा सल्ला दिला.  त्या जाहिरातीचा तर अपेक्षे बाहेर फायदा झाला.  पुण्यातल्याच नव्हे तर बाहेरगावच्या आणि परदेशातल्या स्त्रिया येथे आल्यावर तिच्या घरी जाऊन खरेदी करू लागल्या. 

 या साऱ्या काळात तिचं  खरेदीसाठी मुंबईला जाणं चालू होतंतसंच विविध प्रदर्शनांमध्ये विणकारांच्या ओळखी होऊनतेही तिच्या घरी वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या साड्या घेऊन येऊ लागले.  आज देशाच्या विविध भागातील 19 विणकर   तिच्या घरी येऊन  तिला   हव्या  तशा  साड्या  पुरवतात. 

अशा तऱ्हेने व्यवसाय उत्तम स्थितीत सतत वाढत असताना “कोरोना” चे संकट आलं.  लोकांचं घराबाहेर पडणं थांबलंमग साड्या घ्यायला मीनाच्या घरी येणार कोण ? पण ” देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय आला !

 बायकांना त्यांच्या घरबसल्या साड्या निवडता याव्यात  म्हणून मीनाने साड्यांचे व्हिडिओ तयार करून ते “फेसबुक” वर टाकायला सुरुवात केली आणि बायकांनी त्यावरून सिलेक्ट केलेल्या साड्या पार्सलने त्यांना घरपोच पाठवल्या.  तिच्या या प्रयोगाने जे  यश    मिळालं  ते तर तिलाही  अनपेक्षित  आणि   थक्क  करणारे  होते  ! कारण लॉकडाऊन ने आता धंदा बसणार का काय अशी चिंता मीनासह  सर्वच  व्यावसायिकांना त्यावेळी  भेडसावत  होती  परंतु  मीनाचा  व्यवसाय  भरभराटीला आला. !  बायकांना तिची घरपोच पार्सल सेवा अतिशय पसंत पडली आणि तिच्या  ग्राहकांच्या संख्येत भरपूर वाढ झाली. !  त्या वेळी   खरं  तर  तिच्या घरात सून बाळंतीण होती.  मीनाला नेहमीच्या  कामात   ही  फार  मोठी  भरच  होती  !  प़ण  मीनाचं  हे हे गृहिणीपण    आणि , मुलांनातवंडांचं आणि बाळंतीण सुनेचंही  सगळं करून सदैव हसत मुखाने सेवा देणारी “साडी विक्रेती “हे    तिचं  वैशिष्ट्य पूर्ण   रूप  महिलांना अतिशय पसंत पडलं  ! पुण्यातल्याच   नव्हे  तर  बाहेरगावच्या  आ़़़णि    परदेशातून   येणाऱ्या  महिला  ग्राहक ही  साड्या घ्यायच्याच तर पुण्यात “मीना” कडेच   !  या  विचाराने  तिला  फोन  करू  लागल्या  ! अशा  तरहेने  गिऱ्हाईकांची रोजच भर पडू लागली.! 

वास्तविक  लॉकडाऊन मुळे कुरिअर सेवा बंद होती. तसंच मीनाने तिच्या मदतीसाठी घेतलेल्या नोकरदार मुलीही तिच्याकडे येऊ शकत नव्हत्या.  पण तेव्हा अनिरुद्धने आणि मुलाने तिला घरातल्या कामापासून ते पार्सल पोहोचवण्यापर्यंत हवी ती मदत केली ,   आणि  मीनाच्या  ग्राहकांच्या  सर्व  ऑर्डर्स   यशस्वीपणे  पूर्ण  होतील  याची  खबरदारी    घेतली असं मीनाने आवर्जून सांगितलं. 

 याच दरम्यान अमेरिकेतील एक मराठी उद्योजिका पुण्यात आली आणि तिने दरवर्षी 90 साड्या तिकडे पाठवण्याची ऑर्डरच मीनाला देऊन टाकली.  अशा ऑर्डर्सच्या बरोबरीने मीनाला वेळोवेळी प्रदर्शनातील तिच्या स्टॉलने खूप व्यवसाय वृद्धी करून दिली.  साड्यांच्या व्यवसायाने मीनाला पैसा , प्रसिद्धी , खूप आनंदयशाचं समाधानस्वतंत्र ओळख असं बरंच काही मिळालं . याच बरोबरीने लोकांचे विविध नमुने पाहायला मिळाले.  “तू गरज म्हणूनच घरातून व्यवसाय करतेस म्हणजे तू एक गरजू व्यक्ती आहे”  असं वाटायला लावणाऱ्याअपमानास्पद वागणूक देणाऱ्या स्त्रियाही तिला भेटल्या.  पण त्या कशाकडेच लक्ष न देतानादरवर्षी आपल्या कामातून मनाला समाधान मिळवत मीना पुढे जात राहिली . 

याच दरम्यान “होम लँड” नावाने एक सुपर शॉपी चालवण्याचा उद्योगही तिने दीड दोन वर्ष केला.  त्यासाठी तिने खूप कष्ट घेतले , आवश्यक ते ट्रेनिंग घेतले.  पण साड्यांचा व्यवसाय आणि “सुपर शॉपी” च काम तिच्या शक्तिबाहेरच झालं . तिचं हिमोग्लोबिन भराभर कमी होऊ लागलं. तेव्हा तिला घरच्यांनी सक्तीने ते बंद करायला लावलं.  मग मीनाने मुकाट्याने पुन्हा फक्त साड्यांवर लक्ष केंद्रित केलं.  अर्थात ” माझी तब्येत चांगली राहण्यासाठी माझं मन माझ्या साड्यांच्या व्यवसायात रमलेलं असणं आवश्यक आहे”म्हणून जमेलो तोपर्यंत हा व्यवसाय चालू ठेवण्याचा तिचा निर्धार कायम आहे . अर्थात तिच्या या “सबबी” ला घरच्यांचा पाठिंबा आहे.  कशाने का होईनातिची तब्येत उत्तम राहणं आणि ती मजेत असणं हेच तिच्या घरच्यांना हवं आहे.  तिच्या घरच्यांनाच नव्हे तर आपल्यालाही आपली मैत्रीण नेहमीच निरोगी , आनंदी उत्साही अशीच हवी आहे ,त्यामुळे आपल्या सर्वांतर्फे मी ही तिला तिच्या व्यवसायासाठी शुभेच्छा व्यक्त करते . 

ऍन सरिता भावे