होम मेकर्स आणि बरंच काही

कलावंत अश्विनी

सुसंवाद -लहानपणापासून सुविचार किंवा संस्कृत श्लोकातून ऐकलेला हा शब्द.  पण त्याचं महत्त्व आपण जेव्हा या जगाच्या व्यवहारात प्रत्यक्ष उतरतो , आणि फायद्या तोट्याची सुखदुःखाची गणित आपल्याला सामोर येतात तेव्हा उमजू लागतं हे खरं!  सुसंवादाने गैरसमज दूर होतातमाणसं मनाने एकमेकांजवळ येतातएकमेकांना मनापासून सहकार्य करतात , पर्यायाने अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकतं , सौदाहार्याचे वातावरण नक्कीच निर्माण होतं. 

आज हे सारं मनात येण्याचं कारण , आपली अश्विनी , अश्विनी अंबिके!

ऐन उमेदीच्या वयात सहचराची  साथ सुटलेली अश्विनीआज  ज्या  तडफेनं आणि उत्साहानं  मार्गक्रमण करत आहे त्यामागे तिने व तिचा पती अश्विनयांनी आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर जे सुसंवादाचे पूल निर्माण केले होते त्यांचा मोठाच हातभार आहे.   त्यावेळी अश्विनीला बँक व्यवहारापासून ते “अश्विन” च्या व्यवसायापर्यंत सर्व गोष्टींची नीट व्यवस्था लावण्यात या दोघांच्या सुहृदांनी सर्वतोपरी मदत केली.  तसंच अश्विनीला तिच्या आवडत्या नाटकलेच्या क्षेत्रात पाय रोवून उभे  राहायलाही !

अश्विनी मूळची पुण्याचीचअश्विनी पुराणिक . भवानी पेठेत ती अकरा जणांच्या एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झाली . शिवाय त्यांच्या घरात तीनशे वर्षाचं जुनं तेलफळादेवीचं देऊळ होतं.  त्यामुळे अश्विनीला लहानपणापासूनच देवळातल्या पूजाअर्चानैवेद्यसण , उत्सवरुढीपरंपरा , मंत्र जागर इत्यादी साऱ्या गोष्टींचा केवळ परिचयच  नव्हता तर त्या करण्यातल्या सहभागाचा आनंदही तिने पुरेपूर लुटला होता.त्यावेळी तिच्या साथीला अर्थातच त्याची चुलत भावंड, आई वडीलकाका काकू असे सारेच असत.  यातच भर म्हणजे पंढरपूरच्या वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या दोन दिवसांचा मुक्काम पुण्यात पालखी विठोबा जवळ असतो.  तेव्हा तिथल्या रस्त्यावरच त्यांच्या पंगती जेवायला बसतात.  त्यावेळी त्यांच्यासाठी लाडू वळणं , त्यांच्यासाठी शिधा बांधून देणे इत्यादी काम रात्री जागून करण्यात किती मजा येईहे अश्विनीने सांगितलं.  अशा या साऱ्या मोठ्या मोठ्या कामांचं मोठंच “खटलं” तिने लहानपणापासून अनुभवलं.  त्यामुळे खूप लोकांमध्ये वावरण्याची तिला सवय लहानपणापासूनच झाली.  तशी ती लहानपणापासूनच धीटहसरी आणि उत्साही होती. 

अश्विनीच्या आत्याच्या कुटुंबाचे गजानन सरपोतदारांसह अनेक मराठी नाट्य चित्र सृष्टीतील कलाकारांशी उत्तम परिचय होतेत्यामुळे आत्याकडे राहायला गेल्यावर अश्विनीला अशोक सराफ ,रंजना, रमेश भाटकर , अमोल पालेकर अशा दिग्गज कलाकारांना जवळून पाहायला मिळे.  सरपोतदारांनी तर तिला लहानपणीच सिनेमात काम करशील का असं विचारलं होतं!

अश्विनीचा चुलत भाऊ त्यावेळी बी.  जे. मेडिकलला शिकत होता.  तोही नाटकात नेहमी भाग घेत असे.  हा भाऊ अश्विनीचा लहानपणापासून आदर्श होता . त्यामुळे त्याच्यासारखंच आपणही नाटकात काम करायचं असं तिने मनाशी ठरवलं होतं.  तशी ती पण शाळेच्या सर्व वर्षात नाटकातनाचात भाग घेत होती . अहिल्यादेवी शाळेत ती पाचवीच्या प्रवेशासाठी गेली तेव्हाच  शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनी तिला नाटकासाठी सिलेक्ट केले . आणि त्या आंतरशालेय स्पर्धेत तिला विदूषकाच्या कामासाठी पहिलं बक्षीसही मिळालं.  त्यामुळे पुढे सर्व वर्ष ती नाटकात असणं ओघानच आलं ! 

कॉलेजमध्ये ही नाट्यकलेत पुढे जाता यावं म्हणून तिने बी. एम.  सी.  सी. त प्रवेश घेतला. तिथेही प्राध्यापक प्रकाश भोंडे सरांनी तिच्या नाटकाच्या बक्षिसाची यादी बघून तिला लगेच प्रवेश दिला . याचा तिला खूप फायदाही झाला. दरवर्षी तिने नाटकात भाग घेतला. त्यावेळी तिला अभिराम भडकमकर, शिरीष लिमये, प्रसाद वनारसे आदी दिग्दर्शक कलाकारांकडून खूप शिकायला मिळाले.  बारावीत असताना तिने उज्वल केसकर यांच्या पुणे युवक केंद्रातर्फे सादर होणाऱ्या नाटकात काम केलं आणि राज्य नाट्य स्पर्धेचा अनुभव घेतला.  कॉलेजतर्फे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आदी स्पर्धांमध्ये ती भाग घेत होतीच.  पुणे युवक केंद्रातही तिने तिला मिलिंद फाटकरसिका जोशी , प्रसन्न केतकर, सतीश तारे, माधव अभ्यंकर, त्यागराज खाडिलकर यांच्या सारखे कलाकार भेटले आणि त्यांच्याशी मैत्री झाली अभिजात आणि जागर या संस्थांच्या नाटकातही तिने कामं केली.

बी. कॉम.  ची पदवी तिने १९९० मध्ये मिळवली.  त्यानंतर तिने दोन तीन छोटे मोठे जॉब केले.  वडलांच्या व्यवसायातही हातभार लावला.  तिचे वडील प्रारंभी खडकीच्या ऍम्युनेशन फॅक्टरीत एक उच्च पदस्थ अधिकारी होते.  अश्विनीच्या जन्मानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि ते स्वतःचा कॉरोगेटेड बॉक्सचा व्यवसाय करू लागले.  अश्विनी बी. कॉम.  झाली तेव्हा वडिलांनी “स्टेशनरी सप्लाय” चा व्यवसाय सुरू केलेला होता.  त्यात अश्विनी मदत करू लागली. 

दरम्यान १९९३ मध्ये अश्विनी चा विवाह झाला, अश्विन अंबिकेबरोबर.  त्यावेळी अश्विन “प्लॅस्टिक बॉटल्स” बनवण्याचा व्यवसाय करत होता.  सासुबाई गोपाळ हायस्कूलच्या प्रिन्सिपल होत्या.  सासरी सर्वांचा अश्विनीला सपोर्ट मिळाला.  त्यामुळे तिची कला प्रांतातील मुशाफिरी चालू राहिली. १९९७ मध्ये अभिराम च्या एका सिनेमातही तिने काम केलं.  तसंच इ.एम.आय.आर. सी.  च्या (एज्युकेशनल मीडिया रिसर्च सेंटर) सात आठ शॉर्ट फिल्म मध्ये तिने काम केलं.  आपला रोटरी मित्र – बाळकृष्ण दामले ह्याच्या मुळे तिला ही कामं मिळाली . या फिल्म सामाजिक जागृतीच्या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन , निर्धूर चूल, बँकेचे व्यवहार इत्यादी विषयांवर होत्या.  याशिवाय बालचित्रवाणीच्या उपक्रमांमध्ये डबिंग करणे , उसना आवाज देणं इत्यादी गोष्टीही अश्विनी हाताळत होती. त्यांच्या हि फिल्म्स मध्ये कामं केली.

अश्विनी चा पती “अश्विन” खूप उत्साही होता.  त्याला “बेकिंग”ची आवड होती. तेव्हा फुड क्राफ्ट इन्स्टिट्यूट चा एक वर्षाचा रीतसर कोर्सही त्यांनी केला.  तो कोर्स झाल्यावर त्याने बेकरी प्रॉडक्ट्स बनवण्याचं ठरवलं. दरम्यान त्याने कारखाना बंद करून कोथरूडमध्ये “खाऊ घर” हे दुकान पाच वर्ष उत्तमपणे चालवलं होतं.  तेथे विविध खाद्यपदार्थ तो विक्रीसाठी ठेवत असे.  “बेकिंग” शिकल्यावर त्याने स्वतःचे उत्पादन करण्याचं ठरवलं.  आणि महात्मा सोसायटीत “प्रॉडकशन  युनिट” उभं केलं.  मोठे मोठे ओवन्स विकत घेतले आणि ३३ उत्पादन सुरू केली.  दरम्यान खाऊ घर बंद करून त्याने अठरा दुकानांना आपली उत्पादनं पुरवायला सुरुवात केली होतीत्यात बिस्किट, पॅटीसब्रेड आदींचा समावेश होता. 

दरम्यान २००१ मध्ये श्रीरंग चा जन्म झाला होता.  घरात आई-वडीलछोटा श्रीरंगव्यवसायाचा पसारा आणि मित्रमंडळी यामध्ये वर्ष भराभर गेली.  २००७ मध्ये अश्विनीच्या सासुबाई गेल्या.  २००९ मध्ये अश्विनी ची आई गेली . २०११ मध्ये अश्विनीचे सासरे गेले आणि पाठोपाठ अश्विन गेला!

अश्विनी ला आता सर्व सांभाळायचं होतं !  श्रीरंगला मोठं करायचं होतं.  आई गेल्याने वडिलांनाही बघायचं होतं , कारण तिचा भाऊ अमेरिकेत असतो. तेव्हा ती आणि वडील एकत्र राहू लागले.  वडिलांनी अश्विनीला खंबीरपणे उभे राहिला उद्योग तर केलं उद्युक्त केलं ! आणि अश्विनी ही खंबीरपणे उभी राहिली.

अश्विनी चे सर्व मित्र आणि अंबिके कुटुंबीयांनी अश्विनीला आधार दिला.  हवी ती मदत देऊ केली . सरपोतदारांच्या मध्यस्थीने अश्विनीने त्यांची बेकरी दुसऱ्याला चालवायला दिली.  हे काम झाल्यावर तिच्या मनावरच एक ओझं कमी झालं.  हळूहळू बँकांचे व्यवहार , घराचे व्यवहार साऱ्या गोष्टी मार्गी लागल्या.  अश्विनीचे वडीलश्रीरंग आणि ती एकत्र राहू लागले.  हे सारं सुरळीत होईपर्यंत २०१५ साल उजाडलं.  त्यानंतरच तिचं लक्ष तिच्या आवडत्या नाटक क्षेत्राकडे वळलं!

नाट्य क्षेत्रातही अश्विनीची मित्रमंडळी तिच्या मदतीला आली. “ट्री पब्लिक फाउंडेशन” चे सीईओ अभिषेक कविटकर यांनी तिला कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मुलांची नाटकं बसवून देण्याची जबाबदारी दिली.  आणि अश्विनी ची नाळ पुन्हा एकदा रंगभूमीशी जोडली गेली ! 

कॉर्पोरेशनच्या दोन शाळांसाठी तिने बसवलेल्या नाटकांना २०१६, २०१७  मध्ये बक्षीस मिळाली.  २०१७  मध्ये भैरवी पुरंदरेने अश्विनीला एस. पी. एम.  शाळेत “ड्रामा टीचर” चं काम करायला सुचवलं.  तिथेही अश्विनीने बसवलेल्या नाटकाला पहिल्याच वर्षी तीन बक्षीस मिळाली. भैरवीने २०१७ मध्ये सुरू केलेल्या “नाटकाची शाळा”  या संस्थेतर्फे त्यांनी कुमार नाट्य चळवळीच्या कामाला सुरुवात केली.  सध्या भैरवीची तब्येत उत्तम नसल्याने अश्विनी संस्थेचे काम पाहत आहे.  लॉकडाऊन मध्ये अश्विनीने या   संस्थेच्या वर्कशॉपच काम ऑनलाईन चालू ठेवलं होतं.  आता संस्थेतर्फे विज्ञानाच्या प्रगतीवर आधारित दीड तासाचा नाटक अश्विनी बसवत आहे. जयंत नारळीकरांच्या “अभयारण्य ” ह्या कादंबरीवर आधारित असलेल्या   या नाटकाचे पहिले व्यावसायिक प्रयोग विज्ञान दिनाचे औचित्य साधून  येत्या २८ फेब्रुवारीला होणार आहेत.

ही सारी कामं चालू असतानाच २०१६ मध्ये अश्विनीने कथक शिकायला सुरुवात केली आणि आज तिने कथकच्या तीन परीक्षा ही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. लहान मुले आणि नृत्य यामध्ये रमणाऱ्या अश्विनीला जणू आता तिचा सूर पुन्हा गवसला आहे!

अश्विनी रोटरीत आल्यावर तिला आणखी मित्र-मैत्रिणी मिळाल्या. तसंच एक सोशल सर्कल मिळाल्याचा तिला खूप आनंद आहे.  क्लबच्या माध्यमातून प्रत्यक्ष सामाजिक कामात भाग घेत असल्याची गोष्ट तिला खूप भावते.  तसेच क्लबच्या कामातून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून खूप काही शिकता येत असल्याचं अश्विनीने सांगितलं.  तिचा मुलगा श्रीरंग आता हॉटेल मॅनेजमेंटच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे,  त्याला “शेफ” व्हायची इच्छा आहे  आणि “फायनान्स”  विषयातही त्याला रस आहे.  त्याचं शिक्षण संपवून मग त्याने त्याला हवं ते करावं अशी अश्विनी ची भूमिका आहे.  ती आता मुलांना मनसोक्त नाट्यकलेचे धडे देण्यात आणि स्वतः कथक मध्ये बुडून जाण्यात खुश आहे. 

अश्विनीला तिच्या सर्व कार्यात यश मिळो हीच शुभेच्छा !!

ऍन सरिता भावे