Skip to main content

संगीतानुभव

पी पी गौरी शिकारपूर

नमस्कार,
संगीत, भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग. लहानपणापासून हे संगीत आपल्याला सोबत करते. संगीतोपचार ही स्वतंत्र शाखा अलीकडच्या काळात उदयास येत आहे. पण आपल्याकडे याचा उपयोग प्राचीन काळापासून होत आहे. श्लोक, मंत्र, प्रार्थना, आरत्या यामार्फत हे काम केले जात होते. मनावर संगीत उत्तम काम करते. आणि हाच धागा पकडून आपण अशी काही गाणी ऐकणार आहोत, त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत, जी मेडिटेशनच्या आधी Imagery म्हणून ऐकता येतात. ज्यायोगे मन शांत होते. एक वेगळी अनुभूती ही गाणी ऐकताना येऊ शकते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, तरी ही हे अनुभव आपल्यालाही येतात का? जरूर बघा.

कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी

भा.रा.तांबे यांची शब्दरचना, संगीत ह्रदयनाथ मंगेशकर आणि दैवी सूर अर्थात गानसरस्वती लता मंगेशकर यांचा. मंगेशकर भावंडांनी अनेक उत्तम भावगीते रसिकांना दिली आहेत. स्वरमेळ अप्रतिम असतोच, पण अतिशय अर्थगर्भ शब्दरचना हे देखील ह्या भावगीतांचे वैशिष्ट्य आहे. ‘कशी काळनागिणी’ हे गाणे जेव्हा ऐकत असतो, तेव्हा एक विरहिणी डोळ्यांसमोर उभी राहते. अफाट वेगाने, दुथडी भरून वाहणा-या नदी काठी, वादळवा-यांत, पूर ओसरण्याची वाट बघत उभी असणारी, केस मोकळे सुटलेली, दु:खीकष्टी, प्रियकराच्या दर्शनासाठी आतुरलेली स्री हे गाणं म्हणते आहे असे वाटते.

पण हळूहळू चित्र बदलायला लागते. गाण्याचा अर्थ वेगळ्याच दिशेला जाऊ लागतो. लक्षात येते की या नदीला काळनागिण म्हटले आहे. काळ एक सापेक्ष संकल्पना. वेगाने वाहणारा हा काळाचा प्रवाह. कधी सुस्त पडलेल्या अजगरासारखा भासणारा तर कधी वेगाने सळसळत जाणा-या नागिणी सारखा. सर्वांना गिळंकृत करत पुढे सरकणारा असा हा काळ. त्याच्या एका किना-यावर अडकून पडलेले आपण. जायचय तर पैलतीरावर तिथे असलेल्या परमतत्वाच्या ठिकाणी विसावा घ्यायचा आहे ही होणारी जाणीव. पण ही नदी तर ओलांडता येत नाहीये. अशा वेळी नदीकडे बघताना लक्षात येते की हे मासे भगवंतावर सर्व भिस्त टाकून किती लाटा येताहेत किंवा काय याचा विचार न करता पोहत आहेत, त्यामुळेच की काय सहज तरून जात आहेत. ज्याप्रमाणे वारीमध्ये हजारो वारकरी नामाचा महिमा गात शेकडो किलोमीटर सहज चालतात, तशीच ही पाखरे देखील नामगायन करत वादळातूनही पार होत आहेत.

आपण पैलतटीच गवत झालो असतो तरी चालले असते. भगवंताचा पदस्पर्श तरी झाला असता. किंवा कदंब वृक्षाचा जन्म मिळाला असता तरी चालले असते, निदान कृष्णसखा तरी भेटला असता.

पुढच्या कडव्यात स्वत:ला पापिण म्हटले आहे. ते एवढ्याच साठी की कर्मबंधनांमुळे आपण या तीरी खिळून राहिलो आहोत, अडकून पडलो आहोत. आत्म्याला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. पण हा विरहाचा अग्नी शस्त्राशिवाय मारतो आहे.. पंचप्राण जे प्रत्येक जीवासाठी सर्वात मुल्यवान असतात ते परमेश्वर चरणी अर्पण करू, परमेश्वर जो या भवसागरातून पार नेणारा नाविक आहे, त्याला प्रार्थना केली आहे की मला पैलतीरी सुखरूप ने. इथे वारंवार एक प्रार्थना आठवू लागते,

अनायासेन मरणम्,
विना दैन्येन जीवनम्
देहान्ते तव सायुज्यं
देहि मे परमेश्वरम्।

शुभंभवतु.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016