Skip to main content

संगीतानुभव

सौ. गौरी शिकारपूर.

नमस्कार

पंडित जितेंद्र अभिषेकींनी अनेक उत्तमोत्तम गीते रसिकांना दिली आहेत. त्यातीलच एक अभंग 

हरीभजनावीण काळ घालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥

विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥

संत संगतीने उमज । आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥

सोहिरा म्हणे ज्ञानज्योती । तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥

जितेंद्र अभिषेकींनी गायलेला आणि संगीतबध्द केलेला हा अप्रतिम अभंग, संत सोहिरोबा यांचा आहे. सध्या संत मंडळींबाबत अनुदार उद्गार गाजत आहेत.  आपण त्या वादात न पडणे उत्तम. आपण त्यांचा संदेश समजून घेऊ या. 

आज मी अभंगातील ओळींचा अर्थ सांगणार नाहीये. तर माझा अनुभव सांगणार आहे. गेल्याच आठवड्यात एक मनांत आलेला विषय मी लिहिला होता. तो या अभंगाकडे घेऊन जात आहे. तोच लेख पुढे जोडत आहे. 

दिसामाजी काही तरी लिहावे असे समर्थांनी म्हटले आहे. बरेचदां ठरवते  याविषयावर लिहू, त्या विषयावर लिहू, पण आळशीपणा, त्यामुळे काहीच लिहिले जात नाही.

पण आज लिहावेच असे वाटले. कारण ही तसेच होते. बरेच दिवस अध्यात्माकडे वळण्याचे नक्की वय काय? असा प्रश्न पडू लागला होता. कारण बरेच जणांना अध्यात्म म्हणजे वैराग्य = नैराश्य असे वाटते हा माझा अनुभव आहे. खरेतर आनंदात जगण्याचा हा एक मार्ग आहे हेच अजून बरेच जणांना कळले नाहीये असे मला जाणवू लागले होते. अर्थात मलातरी अजून नीट कुठे काय कळले आहे?

पण तरी ही त्या दिशेने शोध नक्कीच आहे.

तर झाले असे की दिवसभर एका पुढे एक कामं करून आम्ही नटून थटून, चांदणी चौकापुढच्या एका अलिशान हाॅलमध्ये लग्न सोहळ्याला हजेरी लावायला गेलो. नेहमीप्रमाणे मोहाने मनाचा ताबा घेतलाच, मग थोडेथोडे करत ब-यापैकी गोडधोड, चटपटीत भोजनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मध्ये मटण शाॅप दिसले, कसे बाई लोकं खातात असे आता मी खात नसल्याने मनांत म्हणाले. तेवढ्यात नजर बाहेर बांधलेल्या एका उंच, धष्टपुष्ट बकरा आणि दोन त्याच्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या बक-यांकडे गेली. त्यांच्यासमोर हिरवागार चारा ठेवला होता. तिघे ही मनसोक्त हादडत होते. मनांत विचार आला, यांना माहित नाही पुढे काय वाढून ठेवले आहे, म्हणून खाताहेत. कळले ना! की कधीही मानेवर सुरी चालेल तर खाणपिणं विसरून जातील. किती अज्ञानी आहेत, चरत बसले आहेत.

आणि अचानक जाणवले आपले तरी काय वेगळे आहे? आपण ही तेच करतो आहेत की. प्रत्येकजण अमरपट्टा घेऊन आल्याच्या धुंदीत जगतो आहे. हेवेदावे, मानापमान, चढाओढ यांत व्यस्त आहेत. मग मला काही दिवसांपूर्वीच स्वामी सवितानंदांनी सांगितलेली गोष्ट आठवली. त्यांच्याकडे माझ्यासारखीच एक अज्ञानी बाई आली होती. साधनेत खंड का पडतो हा प्रश्न होता. बरेचदा आपल्याला, आपल्याला आवडेल असेच उत्तर ऐकायला आवडते. पण स्वामीजी सडेतोड बोलणारे होते.

ते म्हणाले तुम्ही घरून इथे कश्या आलात?

बाई म्हणाल्या चालत. 

किती वेळ लागला?

पंधरा मिनीटे.

समजा वाटेत कुत्रा मागे लागला असता तर?

मग पाचच मिनीटे लागली असती की नाही? आणि त्या ही पेक्षा काही भयंकर पाहिले असतेत तर? मग किती वेळ लागला असता? तुम्हाला मागे जे आहे ते दिसत नाहीये म्हणून तुम्ही रेंगाळत चालताय. आम्हाला ते दिसते म्हणून आम्ही धावतो.

संपली गोष्ट.

काय अर्थ घ्यायचा तो आपण घ्यायचा. आज त्याचा अर्थ लख्ख कळला. सुरा दिसत नाहीये म्हणून सगळ्या गमजा सुरू आहेत. ज्यादिवशी ते ज्ञान होईल त्याक्षणी अध्यात्म कळायला लागेल. मग इतक्या लहान वयात कशाला तिकडे वळलीस हा प्रश्नाचे उत्तर ही मिळेल. खरंच किती श्वास उरलेत हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळेच असे म्हटले आहे की ,

हरीभजनावीण काळ घालवू नको रे

हा वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असे ही बरेच जणांना वाटते. मग मला ही कधीकधी वाटते कशाला आपण लोकांना हे ऐकवत बसतो. काय गरज आहे आपल्याला हे सर्व करण्याची? लगेचच दुसरे मन फटकावते, तू कुठे काय करते आहेस? तू निमित्तमात्र आहेस. फार शहाणपण करू नकोस, जे घडतंय त्याची कोणतीही मालकी तुझ्याकडे नाही.

बापरे! फारच भलतीकडे विचार हलत आहेत. चला आजच्या दिवशी एवढे लिखाण पुरे. बाकी नंतर जेव्हा लिहून घेतले जाईल तेव्हा लिहू या.

शुभंभवतु. 🙏🏻

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016