Skip to main content

संगीतानुभव

सौ. गौरी शिकारपूर.

नमस्कार,

आज आपण असे एक गाणे ऐकणार आहोत जे आपल्याला स्वप्नमयी दुनियेत घेऊन जाते. गाणे ऐकताना निसर्गाचे सानिध्य जाणवत रहाते. हिरवीगार शाल पांघरलेली धरती, रंगीबिरंगी फुले-पाने, अतिशय सहजपणे उंच भरारी घेणारे विहंग, मुक्त बागडणारी फुलपाखरे, खळाळते प्रवाह तर कधी शांत जलाशय आणि त्यामध्ये हरवून गेलेले आपण.

हेमंतकुमार-किशोरकुमार-गुलजार हे दिग्गज एकत्र आल्यावर निर्माण झालेली अप्रतिम कलाकृती. हवाओपे लिखदो हवाओंके नाम दो दुनी चार या चित्रपटातले हे गीत, किशोरकुमार यांच्या उत्तम गाण्यांपैकी एक आहे. हेमंतकुमार या प्रतिभावान संगीतकाराने अतिशय सहजसुंदर चाल या गाण्यासाठी योजली आहे. मोजकी वाद्य, मंत्रमुग्ध करणारे स्वर, तितकेच सशक्त शब्द यामुळे हे गीत परतपरत ऐकावेसे वाटते.

परत ऐकताना वेगळे अर्थ उलगडायला लागतात. हवाओपे लिख दो हवाओके नाम. हवेवर कसे नाव लिहिणार? हवा.. आपल्याला हवीहवीशी वाटणारी, आपला श्वास, ज्यावर आपले अस्तित्व अवलंबून आहे. ती कधी श्रेय घेण्याचा प्रयत्न करते का? निसर्गात कोणीच हे करताना दिसत नाही. अहंकारी माणूस सोडला तर. पुढची ओळ येते हम अनजान परदेसियोंका सलाम. आज आपण जिथे आहोत तिथे पोहचण्यामध्ये अनेकांचे योगदान आहे, प्रत्येकाचे नाव माहित असतेच असे नाही. पक्षी गात असतात. कोणासाठी? ते स्वत:च्या आनंदासाठी गातात. मनुष्य ही सहजता विसरला आहे. कोणतीही कला सादरीकरणाची घाई आज सर्वांनाच दिसते. फुलं फुलतात कोणी बघावे म्हणून नाही तर तो त्यांचा सहजभाव म्हणजेच धर्म म्हणून. पक्षी गातात तो त्यांचा धर्म. हवा म्हणजेच वायू. वाहणे आणि वाटेत असणा-या प्रत्येकाला स्पर्श करणे हा वायूतत्वाचा गुण, म्हणजेच धर्म. प्रत्येकाला आपला धर्म सापडला तर तो सुखी समाज. आणि म्हणूनच मला वाटते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. विश्वातल्या सर्वांना स्वधर्म सापडू दे. तेव्हाच जो जे वांछिल ते त्याला मिळेल.

प्रगतीच्या नावाखाली आपण स्वधर्मच विसरत चाललो आहोत. प्रत्येकाला तो सापडला तर त्यासारखा आनंद नाही. आणि त्यावेळीच मग आनंदाचे डोही आनंद तरंग हा प्रत्यय येईल.

पुढचे कडवे तर अप्रतिम आहे. अहंकारामुळे आपण अनेकदा नाती गमावतो. नेहमी जर पाहिलं तर धूप- छाॅंव हे विरूध्दार्थी शब्द आहेत, पण इथे म्हटले की जेव्हा उन्ह हात पसरून आले, तेव्हा सावली खाली आली आणि हसून तिने उन्हाचे स्वागत केले. इथे सकाळ-संध्याकाळ एकत्र खेळतात. सकाळ आणि संध्याकाळ हे देखील विरूध्द अर्थ दाखविण्यासाठी वापरले जातात. प्रत्येकाचा धर्म वेगळा आणि हे तत्व मान्य झाले की मग संघर्ष संपतो.

आपला धर्म सापडलाच नाही तरी हरकत नाही, आपण दुस-याच्या जीवनात आनंद, प्रकाश निर्माण करू शकतो हे सांगणारे तिसरे कडवे. पाणी आपला प्रवाहित राहणे हा धर्म विसरून शांत जलाशय बनले तरी ते आरसा बनून फुलांचे सौंदर्य चमकवते. शेवटी काय तर स्वधर्माचा शोध घेऊन आनंदी राहणे आणि सगळीकडे आनंद निर्माण करणे हाच खरा स्वधर्म.

शुभंभवतु.
सौ. गौरी शिकारपूर.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016