Skip to main content

संगीतानुभव

पी पी गौरी शिकारपूर

आज भा. रा. तांबे यांचीच अजून एक कविता आपण बघणार आहोत. संगीत अर्थातच पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांचे आणि मनाला भिडणारा सूर भारतरत्न लता मंगेशकर यांचा. 

घन तमी शुक्र बघ राज्य करी 

अतिशय गुंतागुंतीची अवघड अशी ही स्वररचना आहे. लता मंगेशकरांनी अतिशय सहजपणे ती गायली आहे. गाण्याच्या अर्थाला पोषक असा वाद्यमेळ इथे दिसतो. मानवी आवाजाच्या जवळ जाणा-या व्हायोलिन या वाद्याचा प्रामुख्याने वापर केला आहे. संपूर्ण गाणे हे वाद्य साथ करत रहाते. चालीबद्दल ही खूप लिहीण्यासारखे आहे. पण आता आपण अर्थ बघू या. 

पूर्वी पण मी हे गाणे उदासवाणे वाटले की गुणगुणायची. पण पहिलेच कडवे म्हणत असे. त्याचा अर्थ त्याचवेळी मी असा घेत असे की मना खिन्न होऊ नकोस. घन म्हणजे काळ्या ढगांमध्ये बघ शुक्र तळपतो आहे. राज्य करतो आहे. त्या काळ्या अंधारात ही त्याने आशा सोडलेली नाही, तो स्वतेजाने तळपतो आहे. तसेच तू ही आशा सोडू नको. पहिले कडवे असे सांगायचे की तुझ्या बंदिस्त वातावणातून बाहेर पड. मोकळा श्वास घे. यशाची दालने तुझ्यासाठी खुली आहेत. उंच भरारी घे. 

पण आता या कवितेचा अर्थ काहीसा वेगळा भासू लागला. मग पुढची कडवी ही पाहिली, आणि एक वेगळाच गर्भितार्थ उलगडू लागला. 

घन म्हणजे दाट. दाट काळोखात चमकणारा शुक्र. पांढरा शुभ्र तारा. पांढरा रंग पावित्र्याचे प्रतीक असलेला असा तो शुक्र. म्हणजेच आपला आत्मा. अज्ञानाच्या अंधकारात गुरफटलो आहोत आपण, आणि या तेजस्वी, पवित्र ता-याचा त्यामुळेच की काय विसर पडलाय. पण तरी तो चमकतोच आहे. मनामुळे जे मायेचे आवरण या आत्म्यावर आहे त्याला तम म्हणजे अंधाराची उपमा दिली असावी. 

पहिले कडवे आहे


ये बाहेरी अंडे फोडूनी,
शुध्द मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी

ये बाहेरी अंडे फोडूनी- आपल्या आत्म्या भोवती पाच आवरणं आहेत असे मानले जाते. अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष, आनंदमय कोष. अंडाकृती आकारात हे कोष आपल्याभोवती आहेत. हे भेदून पुढे जायचे आहे. परमतत्वाच्या ठिकाणी असलेल्या शुध्द पवित्र वातावरणात प्रवेश करायचा आहे. ह्याच देहाच्या मोहात अडकून पडू नकोस. ब्रह्मरंध्रातून वरच्या दिशेने भरारी मार.


फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नूरे, डौलात तरू डुले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी?

 

उत्पत्ती, स्थिती आणि लय हे निसर्गाचे चक्र च आहे. त्यात लय किंवा नष्ट होणे, मृत्यू हा अटळ आहे. फूलातून फळाची निर्मिती होते. पण त्यासाठी फूल नष्ट होते. तसेच छोट्याशा बीजातून महाकाय वृक्ष निर्माण होतो. पण त्याचवेळी ते बीज नाहीसे होते. आपल्यातला अहंकाररूपी बीजाचा नाश झाल्या शिवाय त्या विशाल परमतत्वाशी एकरूपता नाही. तेल जळते तेव्हाच ज्योत पाजळते. आपल्या भोवती मनाने निर्माण केलेले मायेचे आवरण जेव्हा जळून जाईल तेव्हाच आत्मरूपी ज्योत तेजस्वीपणे पाजळेल. अमरतेच्या मागे धावण्यात अर्थ नाही. कारण दर क्षणाला आपल्या अनेक पेशींचा मृत्यू होत असतो आणि नवीन पेशी जन्माला येत असतात. हे चक्र चालू आहे म्हणूनच सृष्टी रचना अव्याहत सुरू आहे.

शेवटचे कडवे-


मना वृथा का भीसी मरणा
व्दार सुखाचे ते हरी करूणा
आई पाहे वाट रे मना
पसरोनी बाहू कवळण्या उरी

हे सगळे कळत असताना उगाच मरणाला का भ्यायचे? मना ही खोटी भीती का उभी करतो आहेस? ‘लागा चुनरीमे दाग’ मध्ये जी कल्पना होती की भौतिक जग हे सासर आहे. तीच इथे पण आढळते. आईच्या घरी म्हणजे माहेरी म्हणजेच स्वगृही परत जायचे आहे. आई स्वागत करायला बाहू पसरून उभी आहे. तिच्या कुशीत विसावा घ्यायचा आहे. त्या आत्मतत्वाकडे परत जायचे आहे. ज्याप्रमाणे माहेरी लाडावलेली मुलगी सासरी जाऊन अनेक गोष्टी शिकते, तसेच काही गोष्टी शिकायला आपल्याला इथे पाठवले आहे.

इथे परत दुसरे गाणे आठवायला लागते, जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेची विसावा. सत् चित् आनंद.

शुभंभवतु.

Close Menu

WE MEET EVERY MONDAY AT 7.00PM

Pusalkar Hall
Lala Lajpatrai Hostel,
Near Shivaji Housing Society,
Senapati Bapat Road, Pune – 411016