याची देही याची डोळा...

लेखक

प्रकाश शेलार (उपशिक्षक)
माध्यमिक विद्यालय एरंडवणा

गौरवशाली परंपरा….

स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक युद्धात एनडीएच्या छात्रांची गौरवशाली परंपरा राहिली आहे. येथील तीन छात्रांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले आहे. अशोक चक्र ( ९ जण ) , महावीर चक्र ( ३१ ) , वीर चक्र ( १५२ ) , किर्ती ( ३३ ) , शौर्य चक्र ( १२२ ) अशी उज्वल परंपरा राहिली आहे.

दीपावलीची सुट्टी चालू होती. रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर चे पदाधिकारी संजीव चौधरी यांचा मला फोन आला. आगामी २८ नोव्हेंबर रोजी क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर मृणाल नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालयाच्या इंटरॅक्ट क्लबची एनडीए दीक्षांत समारंभासाठी भेट देण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी क्लबच्या वतीने विचारणा केली. मी स्वतः लोकमतचा पत्रकार असल्याने एनडीए बाबत माहिती असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मी या भेटीसाठी तात्काळ होकार दिला. सोमवार दिनांक २८ रोजी पहाटे ५.१० वाजता इंटर क्लबचे १५ विद्यार्थी व मी एन.डी.ए. इंडिया खडकवासलाच्या दिशेने रवाना झालो.

त्रिशक्ती गेटवर प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आम्ही परेड ग्राउंड च्या दिशेने निघालो. एकूण ७००० हजार एकरावर विस्तारलेल्या या एन.डी.ए बाबत एव्हाना कल्पना आली होती.सकाळी ६.३० वाजता संचलन सुरु झाले.यावेळी तुम्ही फार काही पाहू शकणार नाही परंतू तुम्ही दोन आवाज ऐकु शकता. हा आवाज आहे छात्रांच्या बुटांचा. छात्र आणि आमच्यातील अंतर साधारण ४०० ते ५०० फुटांचे असेल. इतक्या लांबून एक सुरात हा आवाज ऐकताना आमच्या तोंडातुन जबरदस्तच हाच शब्द बाहेर पडला. इंडियाच्या अधिकाऱ्यांना सलाम दिला जातो.

संचनलानंतर सर्व छात्र एका वेगळ्या ग्राऊंडवर जमा होतात. तिथे मौज मस्ती चालते. ज्याला जे वाटेल ते तो करतो. हे छात्र फुल एनर्जीमध्ये असतात. त्याच हे दृष्य पाहताना पालकांच्या डोळ्यात मात्र आनंदाचे अश्रू असतात. एकीकडे हसू तर दुसरीकडे आसू अशी परिस्थिती असते. ३ वर्षे खडतर प्रशिक्षण केले. परेडशिवाय जीवन यांचे अधुरे. मग अशा सर्वोच्च आनंंदाच्या क्षणी परेड की झलक तो बनती है असेच म्हणावे लागेल.परेड संपल्यानंतर भारतीय वायुसेनेची लढाऊ विमाने सलामी देतात. या चित्तथरारक हवाई कसरती काळजाचा ठोका चुकवतात. कालची सकाळ अगदी मजेत गेली. संचलन , हवाई कसरती, जल्लोष, आनंदाश्रू सगळे काही नेत्रदीपक होते.

त्यानंतर आम्ही सुदान ब्लॉक, म्युझियम,सायन्स ब्लॉक पाहिले. मनसोक्त फोटो सेशन केले. भूक लागल्यामुळे सर्वांनी पेटपूजा केली. सर्व काय पाहिल्यानंतर पावले घराकडे वळायला लागली. येताना आयुष्यभर एनडीएच्या आठवणी आयुष्यभर राहतील एवढा ठेवा घेऊन विद्यार्थ्यासह निघालो.

एनडीएबद्दल थोडसं…..
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए ) ही भारतीय सेनेची संयुक्त सेवा अकादमी असून तीची स्थापना ७ डिसेंबर १९५४ रोजी झाली. येथे छात्रांना सैन्यदलात रूजू होण्याअगोदर तीन वर्षांचे शिस्तबद्ध, खडतर आणि सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाते. खडकवासला येथे सात हजार एकरावर ही संस्था विस्तारली आहे. ‘सेवा परमो धर्म’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. एनडीएमध्ये प्रक्षिक्षण घेण्यासाठी दरवर्षी सुमारे ८ लाख विद्यार्थी ( वयोगट १७ ते व १९ वर्ष ) प्रवेश परीक्षा देतात. त्यातून ३५० विद्यार्थी निवडले जातात. यशस्वी प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट ( पायदळ ) , सब लेफ्टनंट ( नौदल ), फ्लाईंग ऑफिसर ( वायुदल ) या पदावर थेट नियुक्ती होते.

गौरवशाली परंपरा….
स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक युद्धात एनडीएच्या छात्रांची गौरवशाली परंपरा राहिली आहे. येथील तीन छात्रांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले आहे. अशोक चक्र ( ९ जण ) , महावीर चक्र ( ३१ ) , वीर चक्र ( १५२ ) , किर्ती ( ३३ ) , शौर्य चक्र ( १२२ ) अशी उज्वल परंपरा राहिली आहे.

अतुलनीय पराक्रम…
१९६१ च्या युद्धात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल कॅप्टन गुरूबचनसिंह यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले आहे. सेकंड लेफ्टनंट अरूण खेत्रपाल यांना भारत-पाक युद्धात ( १९७१ ) शौर्य गाजविल्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले. कॅप्टन मनोजकुमार पांडे यांना कारगील युद्धात ( १९९९) पराक्रम गाजविल्याबद्दल मरणोत्तर परवीर चक्र देण्यात आले.

उज्वल परंपरा…
आतापर्यंतच्या इतिहासात एनडीएतील ८ छात्र सरसेनापती ( जनरल ) झाले आहेत. सात छात्र नौदल प्रमुख ( अॅडमिरल ), चार छात्रांनी हवाईदल प्रमुख ( एअरचीफ मार्शल ) पदाची धुरा सांभाळली आहे. एनडीएतील पहिल्या बॅचचे लक्ष्मीनारायण दास, एन.सी.सुरी, सुनील रॅाड्रिंग्ज, तीन विद्यार्थी पुढे जाऊन तिन्ही दलाचे प्रमुख बनले. या तिघांचा फोटो माझ्या संग्रहात आहे. तो मी सोबत देत आहे.

यशवंतरावांची खंत…
दिवंगत सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा खंत व्यक्त करताना म्हणाले होते. एनडीए महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र एनडीएत नाही. ही खंत आता दूर होताना दिसत आहे. एनडीएतील मराठी टक्का आता वाढताना दिसत आहे.

दौंडचा अभिमान…
देवकरवाडी येथील सिद्धेश दीपक खळदे याने एनडीएतील तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण काल पुर्ण केले. काल एनडीएत उपस्थित राहुन त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. खळदे दांम्प्त्याने आपला एकुलता एक मुलगा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवला आहे. सलाम त्यांच्या संस्काराला आणि त्यागाला.

शेवटी रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर चे मानावे तेवढे आभार थोडे आहेत. रोटरीचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यार्थी यांचे मनोमन आभार मानतो. भविष्यामध्ये माध्यमिक विद्यालयाचा एखादा विद्यार्थी एनडीए मध्ये असेल असे स्वप्न या दिवसापासून मी पाहण्यास सुरुवात केली.

लेखक

प्रकाश शेलार (उपशिक्षक)
माध्यमिक विद्यालय एरंडवणा